मनजीतने केला टॉप्समध्ये समावेश करण्याचा आग्रह;आशियाई क्रीडा स्पर्धेत घेतली होती सुवर्णधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:58 AM2018-09-05T00:58:10+5:302018-09-05T00:58:31+5:30
‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे.
नवी दिल्ली : ‘२०२० आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेची तयारी करता यावी यासाठी टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेत (टॉप्स) माझा समावेश करावा,’ असा आग्रह आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मनजीत सिंगने केला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाºया मनजीतकडे सध्या नोकरी नाही. निकाल देत नसल्याचे कारण सांगताना ओएनजीसीने मार्च २0१६ मध्ये त्याचा करार वाढविण्यास नकार दिला होता. प्रतिकूल परिस्थितीतही मनजितने सेनेचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू ठेवला आणि त्यानंतर त्याला राष्ट्रीय शिबिरासाठी बोलाविण्यात आले होते.
मनजीत म्हणाला की, ‘मी रिझल्ट देत नसल्याचे कारण देत ओएनजीसीने माझा करार वाढविण्यास नकार दिला. त्याआधी मला मदतनिधी मिळत होती; परंतु आता मी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. मंत्रालय माझी कामगिरी आणि माझ्या समस्येकडे लक्ष देईल, अशी आशा वाटते. माझ्याजवळ एकही प्रायोजक नाही. त्यामुळे क्रीडा मंत्रालय मला टॉप्समध्ये स्थान देईल, अशी मला आशा आहे.’
तो पुढे म्हणाला की, ‘मी पुढील वर्षी आशिया आणि विश्व चॅम्पियनशिप या दोन्ही स्पर्धांत भरीव कामगिरी करू इच्छितो. त्यानंतर आगामी २०२० टोकियो आॅलिम्पिकच्या सरावासाठी मला आर्थिक मदत हवी आहे. क्रीडा मंत्रालय मला मदत करील, अशी मला आशा वाटते.’ (वृत्तसंस्था)
1) हरियाणातील जिंद जिल्ह्याच्या उझाना गाव येथे वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय मनजीत ओएनजीसीसह करार संपुष्टात आला तेव्हा, खेळ सोडण्याच्या मन:स्थितीत होता.
2) तो म्हणाला, ‘मी खूप निराश झालो होतो. मी शेतकरी कुटुंबातून असून माझा परिवार सरावासाठी मला मोठी रक्कम देऊ शकत नसल्याने एक वेळेस अॅथलेटिक्स सोडून द्यावे, असे मनात आले होते.’