मुष्टीयुध्दात मनोजकुमार संघर्षपूर्ण लढतीत पराभूत
By admin | Published: August 15, 2016 05:42 AM2016-08-15T05:42:53+5:302016-08-15T05:42:53+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर मनोज कुमारने (६४ किलो) रविवारी आॅलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीत लढवय्या खेळ केला
रिओ : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॉक्सर मनोज कुमारने (६४ किलो) रविवारी आॅलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीत लढवय्या खेळ केला, पण अखेर त्याला उज्बेकिस्तानच्या फजलीद्दीन गैबनाजारोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. २९ वर्षीय भारतीय बॉक्सर्सने ही लढत ०-३ फरकाने गमावली. २५ वर्षीय गैबानाजारोव्ह विश्व व आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता आहे. तो भारतीय बॉक्सरच्या तुलनेत सरस होता, पण मनोजने लढवय्या खेळ करीत सर्वांचे लक्ष वेधले.
पहिल्या फेरीत मनोजने प्रतिस्पर्ध्याविरुद्ध अंतर राखत त्याला ठोसे लगावण्याची संधी दिली नाही. ही रणनीती उज्बेकिस्तानचा बॉक्सरला त्रस्त करण्यास पुरेशी होती, पण गैबनाजारोव्हने अखेरच्या सेकंदामध्ये डाव्या हाताने दोन पंच लगावत पहिली फेरी जिंकली.
दुसऱ्या फेरीत उज्बेकिस्तानच्या बॉक्सरने वर्चस्व गाजवत चांगले पंच लगावले. मनोजला आपल्या उंचीचा लाभ घेता आला नाही. प्रतिस्पर्धी बॉक्सर्सच्या जोरकस ठोश्यांमुळे तो दडपणाखाली आला, पण त्याने लढवय्या बाणा कायम राखला.
अखेरच्या फेरीत हरियाणाच्या बॉक्सरने आक्रमक खेळ केला, पण गैबनाजोरोव्हच्या फुटवर्कमुळे त्याला संधी मिळाली नाही. सर्व जजेसनी गैबनाजारोव्हच्या बाजूने निकाल दिला, खिलाडूवृत्ती दाखविताना त्याने मनोजची गळाभेट घेतली आणि त्याच्या खेळाची प्रशंसा केली.
मनोज आणि पहिल्या फेरीत पराभूत होणारा शिव थापा (५६ किलो) यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. आता भारताचे आव्हान केवळ विकास कृष्णच्या (७५ किलो) कामगिरीवर अवलंबून आहे. विकासची लढत सोमवारी होणार आहे. (वृत्तसंस्था)