मनप्रीतवर चार वर्षांची बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 07:08 AM2019-04-10T07:08:24+5:302019-04-10T07:08:26+5:30
नवी दिल्ली: आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर डोपिंगमध्ये चार वेळा पॉझिटिव्ह आढळल्याने राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (नाडा) तिच्यावर चार ...
नवी दिल्ली: आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर डोपिंगमध्ये चार वेळा पॉझिटिव्ह आढळल्याने राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (नाडा) तिच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे.
नाडाच्या डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीनुसार मनप्रीतवरील बंदी २० जुलै २०१७ पासून लागू राहील. नाडाचे संचालक नवीन अग्रवाल म्हणाले,‘ मनप्रीत कौरवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरुद्ध डोपिंग विरोधी अपील पॅनलकडे मनप्रीत दाद मागू शकेल.’
या निर्णयानंतर मनप्रीतला २०१७ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपचे सुवर्ण व राष्ट्रीय विक्रम गमवावा लागेल. मनप्रीतचे नमुने २०१७ मध्ये चारवेळा पॉझिटिव्ह आढळले. त्यात चीनच्या जिन्हुआ येथे २४ एप्रिल रोजी आशियाई ग्रँडप्रीक्सचे, पतियाळा येथे १ जूनपासून फेडरेशन चषक स्पर्धेचे, भुवनेश्वरमध्ये ६ जुलैपासून आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे व गुंटूरमध्ये जुलै २०१७ ला झालेल्या आंतरराज्य स्पर्धेचा समावेश होता. या सर्वच स्पर्धांमध्ये मनप्रीतने सुवर्ण पदक जिंकले होते. जिन्हुआ येथे मनप्रीतने १८.८६ मीटर गोळाफेक करीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. या स्पर्धेत घेतलेल्या मनप्रीतच्या नमुन्यात मेथेनोलॉन आढळले, तर अन्य तीन स्पर्धांदरम्यान घेतलेल्या नमुन्यात डिमिथाइलब्यूटीलामाईन हे द्रव्य आढळले.