यशाचा मंत्र-कठोर मेहनत, चांगली संगत
By admin | Published: December 11, 2015 12:04 AM2015-12-11T00:04:35+5:302015-12-11T00:04:35+5:30
१४ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल याने कठोर मेहनत आणि चांगली संगत हे आपल्या जीवनातील प्रमुख सिद्धांत आहेत आणि त्या जोरावरच कारकिर्दीती उंची गाठण्यास मदत झाल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : १४ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल याने कठोर मेहनत आणि चांगली संगत हे आपल्या जीवनातील प्रमुख सिद्धांत आहेत आणि त्या जोरावरच कारकिर्दीती उंची गाठण्यास मदत झाल्याचे सांगितले.
३० वर्षीय नदाल म्हणाला, ‘‘मी जेव्हा लहान होतो तेव्हा इतर मुलांप्रमाणेच मीही रोलँ गॅरो, विम्बल्डन आणि अन्य प्रोफेशनल स्पर्धा खेळण्याचे स्वप्न पाहत होतो. हे स्वप्न साकारण्यासाठी माझी जिद्द आणि प्रेरणाच ही माझ्या यशाची किल्ली आहे. मी स्वप्न साकारण्यासठी कठोर मेहनत घेतली आणि मी जेव्हा हे करू शकतो, तर मुलेदेखील ते करू शकतात.’’
आयपीटीएल लढतीआधी तो म्हणाला, ‘‘मेहनतीबरोबरच चांगल्या लोकांची साथदेखील खूप आवश्यक आहे आणि मी त्या बाबतीत सुदैवी आहे. माझे प्रशिक्षक आणि अंकल टोनी यांच्या रूपाने मला मार्गदर्शक मिळाले. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते. मी अशा लोकांना बरोबर ठेवण्याचा सल्ला देईन, जे आपला खेळ समजू शकतील आणि लक्ष्य गाठण्यासाठी मदत करतील.’’
नदालसाठी हे सत्र चांगले ठरले नाही आणि गेल्या एका दशकात एकही गँ्रडस्लॅम त्याला जिंकता आली नाही, असे प्रथमच घडले.
टेनिसप्रेमींसाठी येणारा शनिवार खास असेल. या दिवशी दिल्लीत जगातील पाचवा मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर इंटरनॅशनल प्रिमीयर टेनिस लीग लढतीत आमनेसामने उभे ठाकतील.
या लढतीविषयी नदाल म्हणाला, ‘‘रॉजर फेडररसोबत अनेक वर्षांपासूनची माझी ‘दुश्मनी’ विशेष ठरली आहे आणि आता आमच्या दोघांत अजून लढती खेळवल्या जातील, अशी आशा आहे. जेव्हा आम्ही दोघे आपसात खेळू, तेव्हा भारतातील क्रीडाप्रेमींसाठी एक सुरेख दृश्य असेल. या सामन्यासाठी मी विशेष उत्साही आहे.’’ (वृत्तसंस्था)