मनू - अनमोल यांना सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:59 AM2018-03-28T03:59:25+5:302018-03-28T03:59:25+5:30
मनू भाकर व अनमोल या जोडीने मंगळवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र स्पर्धेत पात्रता फेरीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.
सिडनी : मनू भाकर व अनमोल या जोडीने मंगळवारी १० मीटर एअर पिस्तुल मिश्र स्पर्धेत पात्रता फेरीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले. भारताचे आयएसएसएफ ज्युनिअर विश्वकप नेमबाजी स्पर्धेतील हे सातवे सुवर्णपदक ठरले. गनेमत शेखों हिने महिलांच्या ज्युनिअर स्किट फायनलमध्ये ३६ गुणांसह कांस्यपदकाचा मान मिळवला.
१० मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत १७ वर्षीय श्रेया अग्रवाल व १९ वर्षीय अर्जुन बाबूताने कांस्यपदक पटकावले. त्यांनी ४३२.८ गुण मिळवले. भारताच्याच इलावेनिल वलारिवान (१८) व तेजस कृष्णा प्रसाद (२०) जोडीला या स्पर्धेत ३८९.१ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
मनू व अनमोल यांनी आपल्या गटात सुुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. त्यांनी पात्रता फेरीत सर्वाधिक स्कोअर नोंदवताना ज्युनिअर क्वालिफिकेशनमध्ये विश्वविक्रम केला. अनमोल व मनू यांनी ७७० गुणांसह हा विक्रम नोंदवला.
त्यानंतर अंतिम फेरीत त्यांनी पहिल्या सिरिजमध्ये कामगिरीत सातत्य राखले. ते आपले प्रतिस्पर्धी चीनचे लियू जिनयावो व ली झुई यांच्याविरुद्ध आघाडी राखून होते. अखेर त्यांनी ४७८.९ गुण नोंदवले. सध्याच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत त्यांचे १.८ अंक कमी आहेत. चीनने रौप्य व कांस्य अशी दोन्ही पदके पटकावली. लियू जिनयाओ व ली झुई ४७३.३ गुणांसह दुसऱ्या तर वांग झेहाओ व झियो झियाझुआन ४१०.७ गुणांसह तिसºया स्थानी राहिले.
भारताच्या दुसºया संघात १८ वर्षीय गौरव राणा व १९ वर्षीय महिमा तुर्ही अग्रवाल यांचा समावेश होता. अंतिम फेरीत त्यांना ३८ शॉटनंतर बाहेर व्हावे लागले. त्यावेळी त्यांच्या खात्यावर ३७०.२ गुणांची नोंद होती व ते चौथ्या स्थानी होते. (वृत्तसंस्था)
२८मार्चला मनू २५ मीटर एअर पिस्तूल गटात सहभागी होणार असून यामध्येही तिचा सुवर्णवेध घेण्याचा प्रयत्न असेल. यानंतर ती राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यास रवाना होईल.
७ सुवर्णपदकांसह भारत आता एकूण १७ पदके पटकावित दुसºया स्थानी आहे. चीन ८ सुवर्णपदकांसह एकूण २१ पदकासह अव्वल स्थानी आहे.