हम होंगे कामयाब ! ‘मनू’ मे है विश्वास! ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक हॅट्ट्रिकवर साधणार ‘निशाणा’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:36 AM2024-08-03T05:36:52+5:302024-08-03T05:38:27+5:30
विशेष म्हणजे आतापर्यंत भारताच्या खात्यातील तीन पदकांपैकी दोन पदके मनूने पटकावली आहेत.
पॅरिस : एकाच ऑलिम्पिकमध्ये तीन पदकांची कमाई करण्याची ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर सज्ज झाली आहे. मनूने २५ मीटर पिस्टल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून भारताच्या चौथ्या ऑलिम्पिक पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत भारताच्या खात्यातील तीन पदकांपैकी दोन पदके मनूने पटकावली आहेत. शनिवारी मनूच्या स्पर्धेची अंतिम फेरी रंगेल.
मनूने २५ मीटर पिस्टल स्पर्धेच्या पात्रता फेरीत दुसरे स्थान पटकावत दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. हेच सातत्य ती अंतिम फेरीतही कायम राखेल, असा विश्वास भारतीयांना आहे. त्याचवेळी, याच स्पर्धेत सहभागी झालेली अन्य भारतीय नेमबाज ईशा सिंग हिला मात्र २६व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनूने प्रिसिजनमध्ये २९४, तर रॅपिडमध्ये २९६ अशी एकूण ५९० गुणांची कमाई करत अंतिम फेरी गाठली.
क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंसाठी लावले एसी
पॅरिस आणि नेमबाजी स्पर्धा सुरू असलेल्या शेटराउ येथे सध्या प्रचंड गरमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार पॅरिसचे तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक झाले आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना उष्ण वातावरणासह आर्द्रतेचा त्रास होत आहे. त्यामुळे भारतीय क्रीडा मंत्रालयाने क्रीडाग्राममध्ये खेळाडूंच्या खोलीत ४० पोर्टेबल एसी लावले. फ्रेंच दूतावास व भारतीय ऑलिम्पिक संघाशी चर्चा करून येथे एसी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
थोडक्यात हुकले पदक
तिरंदाजीच्या मिश्र दुहेरी गटात भारताच्या धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत या जोडीला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत धडक मारून धीरज-अंकिता यांनी भारतीयांची उत्सुकता उंचावली होती. परंतु, बलाढ्य दक्षिण कोरियाविरुद्ध २-६ असा पराभव झाल्यानंतर भारतीय जोडी कांस्य पदकाच्या लढतीत खेळले. येथे अमेरिकेविरुद्धही २-६ असा पराभव झाल्याने भारतीयांचे पदक हुकले. उपांत्य सामन्यात कोरियाविरुद्ध भारतीयांनी पहिला सेट जिंकून चांगली सुरुवात केली होती.