Paris Olympics 2024 : Manu Bhaker प्रसिद्धीच्या झोतात! 'त्या' जाहिराती करणाऱ्यांना बसणार दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:30 PM2024-07-31T12:30:33+5:302024-07-31T12:34:06+5:30
paris olympics 2024 : मनू भाकरने दोन कांस्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.
manu bhaker paris olympics : ऑलिम्पिक म्हणजे खेळाडूंसाठी स्वत:ची एक ओळख बनवण्याचे मोठे व्यासपीठ असते. सध्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा थरार रंगला आहे. भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. रविवारी मनू भाकरने वैयक्तिक कांस्य पदक जिंकले होते. मंगळवारी यात भर पडली असून, तिने सरबजोत सिंगसोबत आणखी एका पदकाला गवसणी घातली. मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदक पटकावले. पदविजेती मनू प्रसिद्धीच्या झोतात असून, आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनली आहे.
मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला. याआधी रविवारी मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली आहे. खरे तर मनू भाकरचे व्यवस्थापन आयओएस स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट ही कंपनी करते. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच अनेकांनी मनूचा फोटो वापरून अभिनंदनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या. यावर मनूच्या व्यवस्थापन कंपनीने आक्षेप घेतला. मनूला न कळवता तिचे फोटो आणि व्हिडीओ वापरून अभिनंदनाच्या जाहिराती बनवणाऱ्या ब्रँडवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तिच्या टीमने स्पष्ट केले. अशी माहिती 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिली.
मनूच्या व्यवस्थापन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कालपासून जवळपास दोन डझन ब्रँड्स जे मनूशी संबंधित नाहीत, त्यांनी तिचे फोटो आणि त्यांच्या ब्रँडसह सोशल मीडियावर अभिनंदनपर जाहिराती जारी केल्या आहेत. हे चुकीचे असून याला कोणतीही परवानगी नाही. कायदेशीररित्या आम्ही या ब्रँडना कायदेशीर नोटीस बजावत आहोत. संबंधित कंपन्या मोफत मार्केटिंग करू पाहत आहेत. ते आम्ही चालू देणार नाही.