मनु-सुमीत यांचे शानदार विजेतेपद
By Admin | Published: December 23, 2015 01:14 AM2015-12-23T01:14:17+5:302015-12-23T01:14:17+5:30
मनु अत्री आणी बी. सुमीत रेड्डी या भारतीय जोडीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये वर्षाची अखेर विजयाने करताना मॅक्सीको ओपनचे शानदार विजेतेपद पटकावले
नवी दिल्ली : मनु अत्री आणी बी. सुमीत रेड्डी या भारतीय जोडीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये वर्षाची अखेर विजयाने करताना मॅक्सीको ओपनचे शानदार विजेतेपद पटकावले. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने थायलंडच्या बोडिन इसारा आणि निपितफोन पी. यांना लोळवले.
स्पर्धेत तृतीय मानांकन लाभलेल्या मनु - सुमीत यांनी लौकिकानुसार खेळ करताना अंतिम सामन्यात धडक मारली. याआधी त्यांनी यूएस ओपन आणि डच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे या जोडीवर भारताच्या विजेतेपदाच्या आशा होत्या. दरम्यान, दोन सेटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात मनु - सुमीत यांना पहिल्या सेटमध्ये थायलंडच्या जोडीने झुंजवले. २०-१६ अशी भक्कम आघाडी मिळवलेली असताना भारतीयांना प्रतिस्पर्धी जोडीकडून कडव प्रतिकार मिळाला. यावेळी इसार - निपितफोन यांनी जबरदस्त पुनरागमन करताना सलग ४ गुण मिळवून बरोबरी साधली. मात्र मोक्याच्यावेळी खेळ उंवताना भारतीयांनी २२-२० अशी बाजी मारुन १-० अशी आघाडी घेतली.
यानंतर पुन्हा एकदा मनु - सुमीत यांनी सुरुवातीपासून आपले वर्चस्व राखताना दुसरा सेटही जिंकत इसारा - निपितफोन यांना २२-२०, २१-१८ असा धक्का दिला आणि स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद उंचावले. (वृत्तसंस्था)