मराठमोळ्या ऋतुजाने मिळवून दिले सुवर्ण; ३६ पदकांसह भारत चौथ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 06:52 AM2023-10-01T06:52:14+5:302023-10-01T06:52:30+5:30
ऋतुजाचे हे पहिले आशियाई खेळातील पदक आहे, तर रोहन बोपण्णा दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता ठरला.
होगंझोउ : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे. शनिवारी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेईच्या एन शो लिआंग आणि संग हाओ हुआंग यांचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करत सोनेरी कामगिरी केली.
ऋतुजाचे हे पहिले आशियाई खेळातील पदक आहे, तर रोहन बोपण्णा दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता ठरला.
वयाच्या आठव्या वर्षी हाती घेतली रॅकेट; लवंगची कन्या झाली ‘गोल्डन गर्ल’
nचीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेतील टेनिस मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णासोबत लवंग (ता. माळशिरस) येथील ऋतुजा भोसलेने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
nवयाच्या अवघ्या आठव्या वर्षी हाती घेतलेल्या रॅकेटने तिला गोल्डन गर्ल केले. ऋतुजाचे भारतात आगमन झाल्यानंतर तिच्या स्वागतासाठी लवंगकर उत्सुक आहेत.
मूळ लवंग येथील संपत ज्ञानोबा भोसले यांची कन्या असलेल्या ऋतुजाचे बालपण, शालेय शिक्षण पुण्यात, तर पदवीचे शिक्षण अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठात झाले.
nवडील संपत भोसले हे धावणे, हातोडा, थाळी, गोळा, भालाफेकीचे राष्ट्रीय खेळाडू आहेत. पोलिस खात्यातील नोकरीनिमित्ताने लवंग सोडल्यावर पुण्यात ते स्थायिक झाले.
सातव्या दिवशी पदकांची लयलूट
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी टेनिस आणि स्क्वॅशमध्ये सुवर्ण कामगिरी करीत भारताने दहावे सुवर्णपदक पटकावले. भारतीय नेमबाज सरबज्योतसिंग आणि दिव्या टीएस यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र सांघिक स्पर्धेचे रौप्य जिंकले. धावपटू कार्तिक कुमार आणि गुलवीर सिंग यांनी पुरुषांच्या १० हजार मीटर शर्यतीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.
घोडदौड कायम
पुरुष हॉकीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०-२ गुणांच्या फरकाने धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
टेबल टेनिसमध्ये सुर्तिथा- अयहिका मुखर्जी यांनी ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरी गाठताच आणखी एक पदक पक्के झाले.
महिला मुष्टियुद्धात प्रीती पवार, लवलीना बोरगोहेन आणि नरेंद्र यांनी उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले आहे.