क्रीडासंस्कृतीला चालना देण्यासाठी मॅरेथॉन महत्त्वाची: पुनित बालन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 07:58 AM2022-04-09T07:58:29+5:302022-04-09T07:58:34+5:30
कुठल्याही देशाच्या उन्नतीसाठी क्रीडा संस्कृती बहरत असणे हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशाचा क्रीडाक्षेत्रातला सहभाग आणि आपल्या खेळाडूंचे यश हे देशातील नागरिकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतं.
कुठल्याही देशाच्या उन्नतीसाठी क्रीडा संस्कृती बहरत असणे हा महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशाचा क्रीडाक्षेत्रातला सहभाग आणि आपल्या खेळाडूंचे यश हे देशातील नागरिकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतं. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक ओळख मिळवून देतं आणि एकीची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवतं. आपल्या मुष्टियोध्यांच्या जोरावर सुवर्णकमाई करणारा क्युबा किंवा धावपटूंच्या पराक्रमामुळे ओळखला जाणारा जमैका यांसारखे लहानसे देश केवळ त्यांच्या क्रीडा संस्कृतीच्या जोरावर आगेकूच करताना आपल्याला दिसून येतात.
गेल्या काही वर्षांत भारतातील क्रीडाक्षेत्र खूपच झपाट्याने प्रगती करताना दिसून येत आहे आणि विशेष करून अॅथलेटिक्स - ज्याला क्रीडाक्षेत्राची जननी मानले जाते अशा स्पर्धांतही भारतीय खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून येत आहेत. युवा पिढी नीरज चोप्रासारख्या युवा खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवून क्रीडाक्षेत्रात नाव कमावण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहे. आपल्याला जर या धडपडीला अजून पाठबळ द्यायचे असेल, तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्वप्रथम तंदुरुस्तीचे महत्त्व रुजवले पाहिजे. पाश्चात्य देशातील नागरिकांनी हे जाणले आहे आणि त्यांच्याकडे आबालवृद्ध कुठल्या न कुठल्या व्यायामाद्वारे आपल्याला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याकडील मॅरथॉन स्पर्धा पाहताना हे प्रकर्षाने जाणवते. मॅरेथॉन किंवा धावणे हा असा क्रीडा प्रकार आहे जो कुठलीही व्यक्ती सहजगत्या आत्मसात करू शकते आणि कित्येक वर्षे त्याद्वारे स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकते.
ज्या वेळी आपला समाज म्हणून एकसंधपणे तंदुरुस्तीच्या दिशेने प्रवास सुरु होतो, त्या वेळी आपसूकच क्रीडासंस्कृतीला कमालीचे पाठबळ मिळते. दैनिक लोकमत गेली काही वर्षे या दृष्टीने प्रयत्नशील राहिले आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांत सुरुवातीपासूनच आम्हालाही सहभागी होता आले आणि समाजाच्या दृष्टीने काही योगदान देता आले त्याबद्दल आम्हाला कमालीचे समाधान मिळाले आहे.
मॅरेथॉन म्हणजे आनंदाचा सोहळा
- मॅरेथॉन म्हणजे धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य जपू पाहणाऱ्यांसाठी पर्वणी
- मॅरेथॉनद्वारे दिला जात आहे सामाजिक संदेश
- मॅरेथॉन म्हणजे समाज म्हणून एकसंधपणे तंदुरुस्तीच्या दिशेने प्रवास
- मोठ मोठे कलाकार, व्यावसायिक, खेळाडू आणि नामवंत व्यक्ती आदींचा सहभाग हे आकर्षण
- नियमितपणे धावण्याकडे नागरिकांचा वाढता कल
पुनित बालन
अध्यक्ष, पुनित बालन ग्रुप