एका पायाने घेतली मरियप्पनने ‘सुवर्णझेप’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2016 04:06 AM2016-09-11T04:06:28+5:302016-09-11T04:06:28+5:30
पायाने अधू असूनही दोन पायांवर भक्कम उभ्या राहणाऱ्या अनेकांना लाजवेल, अशी कामगिरी भारताच्या मरियप्पन तंगवेलू याने शनिवारी केली.
रिओ : पायाने अधू असूनही दोन पायांवर भक्कम उभ्या राहणाऱ्या अनेकांना लाजवेल, अशी कामगिरी भारताच्या मरियप्पन तंगवेलू याने शनिवारी केली. रिओ पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी त्याने उंच उडीत ‘झेप’ घेत सुवर्णपदक पटकावले. याच स्पर्धेत पोलिओग्रस्त वरुणसिंग भाटी याने कांस्य पदक मिळवले.
मरियप्पन व वरुणच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भारतीयांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छांचा आणि बक्षिसांचा वर्षाव केला. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मरियप्पनला दोन कोटींचे बक्षीस जाहीर केले. क्रीडा मंत्रालयानेही ७५ लाख रुपयांचे इनाम घोषित केले. पाच वर्षांचा असताना शाळेत जाताना बसने धडक दिल्याने त्याने उजवा पाय गमावला. पाय गेला, जिद्द नव्हे. ‘सुवर्ण’उडी मारण्यासाठी तो झटत राहिला व शनिवारी स्वप्नाची पूर्तता झाली. २१ वर्षांच्या मरियप्पनने १.८९ मीटर ऐतिहासिक उंच उडी घेतली. या प्रकारात सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू.
ट्युनेशिया ग्रांप्री स्पर्धेत १.७८ मीटर उंच उडी घेत मरियप्पनने सुवर्ण जिंकत रिओसाठी पात्रता मिळवली होती. पॅरालिम्पिकमध्ये ‘ए’ लेव्हल पात्रतेसाठी १.६०मीटर उंच उडी आवश्यक
असते. (वृत्तसंस्था)
मरियप्पनचा जन्म तामिळनाडूतील सेलम शहराजवळच्या एका लहानशा गावात झाला. आई भाजी विकते. काही वर्षांपूर्वी त्याने वैद्यकीय उपचारासाठी तीन लाख कर्ज घेतले होते, जे अजूनही थकीत आहे.
लहानपणापासून व्हॉलीबॉलची आवड. तो व्हॉलीबॉलमध्येही रमला. क्रीडा शिक्षकाने त्याच्यातील कौशल्य हेरले.
१५व्या वर्षी जीवनातील पहिल्या स्पर्धेत भाग घेतला आणि रौप्यवर नाव कोरले.
हा अनेकांना धक्का होता.
राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान तो चर्चेत आला. कठीण सरावानंतर तो २०१५मध्ये नंबर वन बनला.