‘मार्टिन क्रो’चे निधन
By admin | Published: March 4, 2016 02:54 AM2016-03-04T02:54:42+5:302016-03-04T02:54:42+5:30
न्यूझीलंडचा महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो याने दीर्घकाळ कॅन्सरशी दिलेली झुंज गुरुवारी अखेर संपुष्टात आली. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने आॅकलंड येथे नातेवाइकांच्या उपस्थित अखेरचा श्वास घेतला.
वेलिंग्टन : न्यूझीलंडचा महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो याने दीर्घकाळ कॅन्सरशी दिलेली झुंज गुरुवारी अखेर संपुष्टात आली. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने आॅकलंड येथे नातेवाइकांच्या उपस्थित अखेरचा श्वास घेतला. सप्टेंबर २०१४ मध्ये क्रोला रक्ताच्या कर्करोगाचे (लिम्फोमा) संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले होते. आॅकलंड येथेच त्याच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. क्रिकेटपटू वडील डेव्ह क्रो यांनी मार्टिन आणि धाकटा जेफ क्रो यांना एकाचवेळी कोर्नवाल क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेटचे धडे दिले. पुढे दोघेही न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघातून खेळले. १९८२ ते १९९५ या १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत क्रो ७७ कसोटी सामने खेळला. त्याने १७ शतके आणि ५० अर्धशतकांसह ५४४४ धावा केल्या.
वन-डेत ४७०४ धावा त्याच्या नावावर आहेत. निवृत्तीनंतर क्रोने स्काय टी.व्ही.सोबत मॅक्स क्रिकेटची सुरुवात केली. यातूनच पुढे टी-२० क्रिकेट आले. ‘आयसीसी हॉल आॅफ फेम’ने सन्मानित क्रो हा न्यूझीलंडचे फलंदाज रॉस टेलर तसेच मार्टिन गुप्तिल यांचा मेंटर राहिला. (वृत्तसंस्था)