मारूच्या कर्तृत्वाचा सातासमुद्रापार झेंडा, जलतरणातील स्पेशल आॅलिम्पिकमधील यश ठरतेय विशेष मुलांसाठी प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 02:59 AM2017-09-21T02:59:05+5:302017-09-21T02:59:07+5:30
शारीरिक अपंगत्व असतानाही, प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर यश मिळविता येते. पनवेलमधील दिशा मारू या विशेष विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वर्चस्व गाठत, आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजाविली असून, देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
प्राची सोनवणे
नवी मुंबई : शारीरिक अपंगत्व असतानाही, प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर यश मिळविता येते. पनवेलमधील दिशा मारू या विशेष विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वर्चस्व गाठत, आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजाविली असून, देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. अमेरिकेतील लॉस एॅन्जेलिस येथे पार पडलेल्या आॅलिम्पिक वर्ल्ड समर गेम्सच्या ४० मीटर फ्री स्टाइल स्विमिंगमध्ये पनवेलच्या दिशा मारूने रौप्यपदक पटकाविले.
जन्मापासून अपंगत्व आणि गतिमंद असलेल्या दिशाने सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत विशेष मुले कुठेच कमी पडत नाहीत, हे दिशाने दाखवून दिले. वयाच्या पाचव्या वर्षापासून पोहण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या दिशाने आतापर्यंत जिल्हा, राज्यस्तरीय, देशपातळीवरील, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविली. याआधी दिशाने २५ मीटर बे्रस्टस्ट्रोक या जलक्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविले आहे.
२०१३मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पेशल आॅलिम्पिक स्पर्धेत फ्री स्टाइल प्रकारात कांस्य पदक, कर्नाटकातील मोंडा येथे झालेल्या फ्री स्टाइल आणि ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक पटकविले, तर रिले प्रकारात कांस्य पदक पटकविले. तसेच आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक आशिया पॅसिफिक स्पर्धेत रिले प्रकारात दोन कांस्यपदके मिळविली आहेत. दिशा गेल्या २३ वर्षांपासून सीबीडी सेक्टर आठ येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान शाळेत शिकत असून, जलतरणाबरोबर ती इतर खेळांमध्ये, तसेच इतर क्षेत्रातही उत्स्फूर्तपणे सहभाग घेते. सर्वसामान्य मुलांमध्ये कुठे तरी कमी पडत असली, तरीही दिशाच्या पालकांनी त्याची उणीव भासू न देता तिच्यातील कौशल्याला योग्य ‘दिशा’ दिली. यापुढेही नेत्रदीपक कामगिरी करून देशाचे नाव उंचीवर नेण्याकरिता दिशाचे प्रयत्न सुरू आहेत. न चुकता सराव, आत्मविश्वासाच्या बळावर दिशाने मिळविलेले हे यश खेळाडूंना दिशादर्शक ठरत आहे.
>पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे ७ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त दिशाला गौरविण्यात आले. मोदी सरकारने दिशाच्या खात्यामध्ये तीन लाख रुपयांची रक्कम जमा करून तिला अनोखी भेट दिली. केंद्र सरकारने केलेल्या या मदतीमुळे दिशाला आणखी प्रोत्साहन मिळाले.