..अन् मेरीने अवघ्या चार तासांत दोन किलो वजन कमी केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:00 AM2018-09-19T00:00:38+5:302018-09-19T07:03:11+5:30
सिलिसियन स्पर्धेत केली झुंजार कामगिरी
नवी दिल्ली : चार तासात दोन किलो वजन कमी करणे, हे काहीसे अशक्य वाटत असले, तरी सुपरमॉम मेरी कोम हिने पोलंडमधील लढतीच्या आधी ही किमया करून दाखवली.
नुकताच पोलंडच्या गिलवाइसमध्ये झालेल्या १३ व्या सिलिसियन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम जेव्हा तेथे पोहचली तेव्हा तिचे वजन दोन किलोने जास्त होते. तसेच तिच्याकडे चार तासांचा वेळ होता. तिने हे आव्हान पूर्ण केले आणि सोबतच स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी सुवर्ण पदकाची कमाई केली.
पाच वेळची विश्व चॅम्पियन मेरी कोम म्हणाली की, ‘आम्ही सकाळी तीनच्या सुमारास तेथे पोहचलो. वजन मोजण्यास साडेसात वाजता सुरुवात होणार होती. मला ४८ किलो गटात खेळायचे होते. आणि माझे वजन दोन किलोने जास्त होते. माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी चार तास जास्त होते. अन्यथा मी अपात्र ठरले असते. त्यामुळे मी सलग एक तास दोरी वरच्या उड्या मारल्या. त्यानंतर वजन कमी करण्यास सुरुवात केली.’
ती पुढे म्हणाली, ‘आमच्यासाठी एक चांगली बाब होती की आम्ही ज्या विमानातून प्रवास करत होतो. ते विमान जवळपास पूर्ण रिकामे होते. त्यामुळे आम्हाला आराम करता आला. जास्त थकवा झाला नाही. नाहीतर मी स्पर्धेत सहभागी होऊ शकले नसते.’ दोन महिन्यांनी मेरीकोम वयाची ३६ वर्ष पूर्ण करणार असून तिने हे स्पष्ट केले की, ती २०२० आॅलिम्पिक पर्यंत आपला खेळ सुरू ठेवेल. (वृत्तसंस्था)