आईस्क्रीम खाणे आणि दररोज 15 किमी धावणे, असा आहे Mary Kom चा फिटनेस प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 03:48 PM2022-12-22T15:48:36+5:302022-12-22T15:49:01+5:30
Mary Kom : नाश्त्यामध्ये मेरी कोम वर्कआउट करण्यापूर्वी हलका स्नॅक्स घेते
नवी दिल्ली : "निरोगी शरीरात एक निरोगी मन" असे मंत्र भारताची स्टार बॉक्सिंगपटूमेरी कोम आपल्या व्यावसायिक आणि शारीरिक जीवनासाठी नेहमी उच्चारते. मेरी कोम आपल्या खेळासोबतच फिटनेससाठीही ओळखली जाते. तिला पद्मविभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान, मेरी कोमने अलीकडेच आपले फिटनेस रुटीन आणि डाएट प्लॅन शेअर केला आहे. निरोगी शरीर आणि मन राखण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात कशी करते, याबाबत मेरी कोमने सांगितले आहे.
एका मीडिया मुलाखतीदरम्यान मेरी कोमने सांगितले की, ती आपल्या दिवसाची सुरुवात 15 किलोमीटर धावून करते. धावणे केवळ बॉक्सिंग सरावासाठी शरीर गरम करत नाही तर एक उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम देखील देते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, स्टॅमिना वाढतो आणि शरीरातील चरबीही बर्न होते. धावण्याव्यतिरिक्त, मेरी कोम दोरी उडी, शॅडो बॉक्सिंग, वजन प्रशिक्षण आणि बॅडमिंटन सारखे काही खेळ देखील खेळते.
याचबरोबर, आपल्या डाएट प्लॅनवरही मेरी कोमने भाष्य केले. तिने सांगितले की, संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवडते. त्यात उकडलेले तांदूळ, हिरव्या भाज्या, फळे, मांस आणि ब्रेड यांचा समावेश आहे. तसेच, व्यायामासोबतच कधी कधी संतुलन राखण्यासाठी जिलेबी किंवा आईस्क्रीम आणि काही मिठाई खाते, असेही मेरी कोमने सांगितले.
मेरी कॉम नाश्त्यात 'या' गोष्टी खाते
नाश्त्यामध्ये मेरी कोम वर्कआउट करण्यापूर्वी हलका स्नॅक्स घेते. दुसऱ्या नाश्त्यात ती हिरव्या भाज्या, फळांचा रस, अंडी आणि ब्रेड खाते. तिला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात मांस, डाळी, भाज्या आणि रोटी आवडतात. मांस प्रोटीनची गरज पूर्ण करण्यास मदत करते आणि वजन टिकवून ठेवण्यास देखील मदत करते. पाणी आणि फळांचे रस दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत करतात.