मेरी कोमने बॉक्सिंग पर्यवेक्षकपद सोडले, क्रीडामंत्र्यांच्या सूचनेचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 01:21 AM2017-12-02T01:21:39+5:302017-12-02T01:22:28+5:30
पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि आशियाई विजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिने बॉक्सिंगमधील राष्ट्रीय पर्यवेक्षक पदाचा राजीनामा दिला.
नवी दिल्ली : पाच वेळेची विश्व चॅम्पियन आणि आशियाई विजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम हिने बॉक्सिंगमधील राष्टÑीय पर्यवेक्षक पदाचा राजीनामा दिला. क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सक्रिय खेळाडू पर्यवेक्षक राहू शकणार
नाही, असे स्पष्ट करताच मेरीने पद सोडले.
मागच्या महिन्यात पाचव्यांदा आशियाई सुवर्ण विजेती बनलेली मेरी म्हणाली,‘मी दहा दिवसांआधी क्रीडामंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर पद सोडले. मी हे पद मागितले नव्हते तर या पदावर काम करण्याची आॅफर मिळाली होती. सक्रिय खेळाडूला राष्टÑीय पर्यवेक्षक बनविण्याचा काही नियम आहे का, अशी विचारणा मी त्यावेळी तत्कालीन क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास यांच्याकडे केली होती. त्यावेळी पद स्वीकार कर, असे मला सांगण्यात आले. मी क्रीडा मंत्रालयाच्या विनंतीवरून हे पद स्वीकारले होते. पद मागितलेच नव्हते त्यामुळे कुठल्या वादात पडू इच्छित नाही.’ तत्कालीन क्रीडामंत्री विजय गोयल यांनी मार्च महिन्यात १२ राष्टÑीय पर्यवेक्षक नेमले होते. त्यात मेरी कोमचा समावेश करण्यात आला. याच यादीत आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, आॅलिम्पिकची दोन पदके विजेता मल्ल सुशील कुमार आणि बॉक्सर अखिल कुमार यांचा समावेश होता. सुशील आणि मेरी कोम हे सक्रिय खेळाडू असून अखिल मात्र बॉक्सिंगमध्ये सक्रिय नाही. मेरी कोम पुढे म्हणाली, ‘पर्यवेक्षकपद भूषविण्यात मला कधीही रुची नव्हती. मंत्रालयाच्या आग्रहावरून मी हे पद स्वीकारले. माझ्याकडे अनेक कामे आहेत. मला हे पद गमविल्याची मुळीच खंत नाही.’(वृत्तसंस्था)