मेरीकोम अंतिम फेरी गाठण्यास सज्ज; लवलिना बोरगोहेनकडेही असणार लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:41 AM2018-11-22T01:41:00+5:302018-11-22T01:41:22+5:30
पाच वेळची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (४८ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९ किलो) गुरुवारी येथे केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या गटात दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरतील.
नवी दिल्ली : पाच वेळची विश्व चॅम्पियन एम. सी. मेरीकोम (४८ किलो) आणि लवलिना बोरगोहेन (६९ किलो) गुरुवारी येथे केडी जाधव स्टेडियममध्ये आपल्या गटात दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या इराद्याने रिंगमध्ये उतरतील.
भारताच्या चार बॉक्सर्सनी पदकांच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. यावेळी, सहाव्या सुवर्ण पदकाच्या प्रयत्नात असलेली मेरीकोम उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग विरोधात लढेल. गुरुवारी पाच वजन गटात उपांत्य फेरीचे सामने होतील. तसेच, पाच अन्य गटात अंतिम चारचे सामने शुक्रवारी होतील.
‘मी प्रशिक्षकांसोबत रणनीती बनवली आहे,’ असे मेरीकोमने म्हटले. मेरीकोमने गेल्या वर्षी आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत किम ह्यांग हिला पराभूत केले होते. ती अत्यंत आक्रमक असून तिने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या चोरोंग बाक हिला पराभूत केले. मेरीकोम म्हणाली की,‘मला माहीत आहे की गार्ड केव्हा खाली ठेवायचे. आणि पंच केव्हा मारायचा. मी त्यावर खूप काम केले आहे.’
दुसरीकडे, २१ वर्षांच्या लवलीनाने वेल्टरवेटमध्ये उपांत्य फेरीत चिनी तैपईच्या चेन निएन चीनविरुद्ध विजय मिळवून आपल्या पराभवाचा वचपा घेण्यास उत्सुक असेल. लवलीना हिने सरावानंतर सांगितले की, ‘मी व्हिडिओ पाहून रणनीती आखली आहे. मला आशा आहे की, त्यातून मला मदत मिळेल.’ लवलीना पदकाच्या फेरीत पोहचल्याने खूश आहे.ती पुढे म्हणाली की, ‘येथे विजय मिळवल्यानंतर माझ्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि या स्पर्धेतील अनुभवाचा पुढील तयारीसाठी फायदा होईल.’
दोन अन्य भारतीय सोनिया (५७ किलो) आणि सिमरनजीत कौर (६४ किलो) यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी या दोन्ही रिंगमध्ये उतरतील. सोनिया म्हणाली की,‘याआधी उत्तर कोरियाच्या जो सोनकडून माझा पराभव झाला होता. आम्ही एकमेकांच्या शैलीशी परिचित आहोत.’ सिमरनजीत कौर हिने सांगितले की, ‘मी कठोर मेहनत घेत असून लढतीसाठी तयार आहे.’