मेरी कोमने ऑलिम्पिकचे प्रचारप्रमुख पद सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 05:30 AM2024-04-13T05:30:45+5:302024-04-13T05:31:07+5:30
आयओएने २१ मार्चला मेरीच्या नियुक्तीची घोषणा केली होती
नवी दिल्ली : सहावेळा जगज्जेतेपद पटकावणारी भारताची स्टार बाॅक्सर एम.सी. मेरी कोम हिने शुक्रवारी आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे प्रचारप्रमुख पद सोडण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता असे मेरी कोमने म्हटले आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी.टी. उषा यांनी सांगितले की, मेरी कोम हिने पत्र लिहून या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे.
मेरी कोमने उषा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशाची कोणत्याही रूपात सेवा करणे अभिमानास्पद आहे आणि मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. पण मी ही जबाबदारी पार पाडू शकणार याचे मला दु:ख आहे. मी वैयक्तिक कारणास्तव या जबाबदारीतून माघार घेत आहे. अशाप्रकारे माघार घ्यावी लागत असल्याचे वाईट वाटते पण माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे.
आयओएने २१ मार्चला मेरीच्या नियुक्तीची घोषणा केली होती. लंडन ऑलिम्पिक २०१२मध्ये कांस्यपदक विजेती मेरी कोम २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पथकाची प्रमुख होती.