मारिनविरुद्धच्या लढती अटीतटीच्या होतील : सिंधू
By admin | Published: November 11, 2016 01:06 AM2016-11-11T01:06:35+5:302016-11-11T01:06:35+5:30
विश्वक्रमवारीत नंबर वन असलेली आॅलिम्पिक सुवर्ण विजेती स्पेनची कॅरोलिना मारिन हिच्याविरुद्ध प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये, तसेच भविष्यातही लढती अतिशय संघर्षपूर्ण होतील
भोपाळ : विश्वक्रमवारीत नंबर वन असलेली आॅलिम्पिक सुवर्ण विजेती स्पेनची कॅरोलिना मारिन हिच्याविरुद्ध प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये, तसेच भविष्यातही लढती अतिशय संघर्षपूर्ण होतील, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिने गुरुवारी व्यक्त केला.
मारिनने रिओ आॅलिम्पिकच्या अंतिम सामन्यात सिंधूचा पराभव करीत सुवर्ण जिंकले होते. मध्य प्रदेश सरकारने रौप्य जिंकल्याबद्दल सिंधूचा आज सत्कार केला. या सोहळ्यात बोलताना सिंधू म्हणाली,की मारिन आणि माझ्यात लढती पुन्हापुन्हा व्हाव्यात, अशी चाहत्यांची अपेक्षा असेल. असे झाल्यास भविष्यातील लढती अटीतटीच्या होतील.
रिओनंतर आयुष्यात झालेल्या बदलांबाबत सिंधू म्हणाली, की रिओपासून आयुष्यात फार बदल झाले. रौप्य जिंकल्यानंतर चाहत्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या. खेळाचा स्तर उंचाविण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये तुला स्वत:ला तसेच सायनाला अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळाल्याबद्दल काय वाटते, असे विचारताच ती म्हणाली, की मी याबाबत अधिक विचार करीत नाही. मी केवळ खेळावर लक्ष केंद्रित करीत आहे. खेळात अधिक कोचेस असावेत, या मुद्यावर सहमती दर्शवित सिंधू म्हणाली, ‘केवळ कोचेस नव्हे, तर फिजिओ आणि प्रशिक्षकदेखील हवे.