सामना रंगतदार अवस्थेत
By admin | Published: September 11, 2016 12:43 AM2016-09-11T00:43:35+5:302016-09-11T00:43:35+5:30
भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ दरम्यान पहिली अनधिकृत कसोटी शनिवारी तिसऱ्या दिवशी रोमहर्षक वळणावर पोहोचली आहे
ब्रिस्बेन : भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ दरम्यान पहिली अनधिकृत कसोटी शनिवारी तिसऱ्या दिवशी रोमहर्षक वळणावर पोहोचली आहे. आॅस्ट्रेलिया अ संघाने १५९ धावांचा पाठलाग करताना दिवसअखेर ५९ धावांत ४ फलंदाज गमावले आहेत.
आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला सामना जिंकण्यासाठी १00 धावांची गरज आहे तर भारताला सहा गडी बाद करण्याची आवशयकता आहे. आॅस्ट्रेलिया अ संघाच्या दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने जो बर्न्स (११) आणि ट्रेव्हिस डीन (0) यांना तर पांड्याने कर्णधार पीटर हँड्सकॉम्ब (२४) व अॅरोनने मार्कस स्टॉयनिस (0) याला तंबूत धाडले. दिवसअखेर सलामीवीर कॅमरुन बॅनक्राफ्ट १६ व ब्यू वेबस्टर ६ धावांवर खेळत होते.
त्याआधी भारताने २ बाद ४४ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास प्रारंभ केला. श्रेयस अय्यरने ६ तर मनीष पांडेने ७ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताला तिसरा धक्का ५0 धावसंख्येवर बसला. त्या वेळेस पांडे ११ धावांवर बाद झाला. अय्यर २६ धावा काढल्यानंतर संघाच्या ७८ धावा असताना बाद झाला. कर्णधार नमन ओझाला भोपळाही फोडता आला नाही. भारत अ संघाने त्यांचे ९ फलंदाज १२0 धावांतच गमावले; परंतु जयंत यादवने ७५ चेंडूंत ८ चौकारांसह मौल्यवान ४६ धावा करीत भारताला १५६ पर्यंत पोहोचवले. (वृत्तसंस्था)
भारत अ पहिला डाव २३0 व दुसरा डाव १५६. (जयंत यादव ४६, श्रयेस अय्यर २६, अखिल हेरवाडकर २३, करुण नायर २१. डॅनियल वॉरेल ३/४३, डेव्हिड मुडी ३/६४, मिशेल स्वेप्सन १/२५).
आॅस्ट्रेलिया अ : पहिला डाव २२८ व दुसरा डाव ४ बाद ५९. (पीटर हँड्सकॉम्ब २४, कॅमरुन बॅनक्राफ्ट खेळत आहे १६. शार्दुल ठाकूर २/१४, वरुन अॅरोन १/२८, हार्दिक पांड्या १/१५).