इंग्लंडची बरोबरी

By admin | Published: August 1, 2014 01:12 AM2014-08-01T01:12:47+5:302014-08-01T01:12:47+5:30

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला आज पाचव्या व शेवटच्या दिवशी संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध २६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Match with England | इंग्लंडची बरोबरी

इंग्लंडची बरोबरी

Next

साऊथम्पटन : फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला आज पाचव्या व शेवटच्या दिवशी संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध २६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या निकालासह इंग्लंडने १० कसोटी सामन्यांनंतर पराभवाची मालिका खंडित करण्यात यश मिळविले. उभय संघांदरम्यान ओल्ड ट्रॅफर्डवर ७ आॅगस्टपासून चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
भारताच्या ६ विकेट शिल्लक होत्या आणि पराभव टाळण्यासाठी आज अखेरचा दिवस खेळून काढण्याचे लक्ष्य होते. एजेस बाऊलच्या खेळपट्टीवर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. एकतर्फी झालेल्या या लढतीत इंग्लंडने भारताचा दुसरा डाव ६६.४ षटकांत १७८ धावांत गुंडाळला. धावांचा विचार करता इंग्लंडमध्ये हा भारताचा मोठ्या फरकाने पत्कराव्या लागलेल्या पराभवापैकी एक ठरला. २०११च्या दौऱ्यात नॉटिंघम कसोटीत भारताला ३१९ धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.
कामचलाऊ फिरकीपटू मोईन अलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना २०.४ षटकांत ६७ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अँडरसनने रोहित शर्माला (६) माघारी परतवत आज इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. महेंद्रसिंग धोनी (६) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेचा (नाबाद ५२) अपवाद वगळता भारताच्या अन्य फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देता आले नाही. रवींद्र जडेजाचा (१५) अडथळा मोईन अलीने दूर केला. भुवनेश्वर कुमार (०) व मोहम्मद शमी (०) यांना आज खातेही उघडता आले नाही.
भारताने अखेरच्या ६ विकेट केवळ २४.४ षटकांत गमावल्या. अलीने आज २२ चेंडूंमध्ये १७ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. अलीने चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजारा व विराट कोहली यांना माघारी परतवले होते. रहाणेने १२१ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकारांच्या साह्याने नाबाद ५२ धावांची खेळी केली. ७७ धावांच्या मोबदल्यात या लढतीत ७ बळी घेणारा जेम्स अँडरसन ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)

Web Title: Match with England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.