कलम ३७० हटवल्यावर 'या' ठिकाणी होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 10:26 PM2019-08-31T22:26:10+5:302019-08-31T22:27:03+5:30
या तणावामध्ये जर दोन्ही देशांचे खेळांचे सामने खेळवायचे असतील, तर कोणते ठिकाण सुरक्षित आहे, याची तपासणी केली गेली आहे.
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या तणावामध्ये जर दोन्ही देशांचे खेळांचे सामने खेळवायचे असतील, तर कोणते ठिकाण सुरक्षित आहे, याची तपासणी केली गेली आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतानेपाकिस्तानबरोबर खेळावे का, हा मोठा प्रश्न आहे. एक वर्ग या विरोधात आहे. त्यामुळे हे सामने सुरक्षितपणे खेळवण्यासाठी चाचपणी केली गेली आणि त्यामध्ये एक ठिकाण समोर आल्याचे म्हटले जात आहे. आता हे ठिकाण नेमके कोणते, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हे ठिकाण आहे युरोप खंड.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पात्रता फेरीचे सामने खेळवण्याचा विचार करत आहे. कारण २०२० साली टोकिओ येथे ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा खेळदेखील आहे. या क्वालीफाइंग स्पर्धेत एक सामना तुमच्या देशात आणि दुसरा प्रतिस्पर्धी संघाच्या देशात खेळायचा असतो. पण सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये सामने होऊ शकत नाही. त्यामुळे हे सामने युरोपमध्ये खेळवण्याचा विचार सध्याच्या घडीला सुरु आहे.
क्वालीफाइंग स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात आले आहे. पण क्वालीफाइंग स्पर्धेत या दोन्ही संघांचा सामना होऊ शकतो. सध्याच्या घडीला भारतामध्ये हा सामना होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण पाकिस्तानमध्ये सामना खेळायला भारताचा संघ जाणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.
क्वालीफाइंग स्पर्धेत जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने झाले तर ते या दोन्ही देशांमध्ये होऊ शकणार नाहीत. कारण जर आम्ही भारतात खेळायला तयार आहोत तर त्यांनी आमच्या देशातही खेळायला हवे, अशी मागणी पाकिस्तानचा संघ करू शकतो. त्यामुळे हे सामने दोन्ही देशांत न खेळवण्याचा विचार सुरु आहे. हे सामने सुरक्षितपणे युरोप खंडात खेळवले जाऊ शकतात, असा आयोजकांना विश्वास आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील सामने युरोप खंडात खेळवले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे.