मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी : अमर हिंद मंडळ दुसऱ्या फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 05:18 PM2019-05-04T17:18:54+5:302019-05-04T17:21:34+5:30
महिला गटात निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमी, संघर्ष क्रीडा मंडळ, रा. फ. नाईक विद्यालय या संघानी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे आयॊजीत ९४ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी पुरुष गटात चेंबूर क्रीडा केंद्र, अमर हिंद मंडळ ,नंदकुमार क्रीडा मंडळ ,केदारनाथ क्रीडा मंडळ या संघानी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर, महिला गटात निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमी, संघर्ष क्रीडा मंडळ, रा. फ. नाईक विद्यालय या संघानी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष गटातील पहिल्या सामन्यात मुंबई उपनगरच्या चेंबूर क्रीडा केंद्र या संघाने ठाण्याच्या विजय स्पोर्ट्स क्लब संघाचा अतिशय चुरशीच्या लढतीत ३५-३२ असा ३ गुणांनी निसटता विजय मिळवला. सदर सामन्यात मध्यंतराला चेंबूर क्रीडा केंद्राने २१-९ अशी १२ गुणांची आघाडी घेतली ती आकाश कदम, सागर नार्वेकर यांच्या उत्कुष्ट चढायांमुळे. मध्यंतरानंतर मात्र विजय स्पोर्ट्स क्लब संघाच्या प्रणय पाटील याने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढविली . त्याला धीरज खारपाटील व विजय पाटील यांनी पक्कडीत सुंदर साथ दिली. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत सामना अतिशय चुरशीचा झाला. परंतु विजय स्पोर्ट्स क्लब संघ आपला पराभव टाळू शकला नाही.
पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई शहरच्या अमर हिंद मंडळाने मुंबई उपनगरच्या स्फुर्ती सेवा मंडळाचा २५-२२ असा ३ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यंतराला अमर हिंद मंडळाने १५-९ अशी ६ गुणांची आघाडी घेतली ती सिद्धेश सावरडेकरच्या उत्कुष्ट चढायांमुळे. स्फुर्ती सेवा मंडळाच्या सुहास गौडा याने छान खेळ केला. परंतु तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही.
महिला गटातील सामन्यात मुंबई उपनगरच्या निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमि संघाने ठाण्याच्या जय बजरंग क्रीडा मंडळाचा २५-१९ असा ६ गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात मध्यंतराला निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमि संघाने १३-८ अशी ५ गुणांची घेतली भूमी गोस्वामीच्या सुंदर चढायांमुळे . तिला पक्कडीमध्ये पूनम पवारने चांगली साथ दिली. त्यामुळे सामना संपेपर्यंत निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमि संघाने आपली हि आघाडी राखण्यात यश मिळवले. पराभूत संघाकडून मयुरी बेखंडे हिने एकाकी झुंज दिली.
दिनांक ०३-०५-२०१९ या दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरुष गटात अमर हिंद मंडळाचा सिद्धेश सावरडेकर व महिला गटात निर्विघ्न स्पोर्ट्स अकॅडमि संघाची भूमी गोस्वामी यांची निवड झाली.
अन्य निकाल :
महिला गट : संघर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (३६) वि. शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे (२२).
रा. फ. नाईक विद्यालय, नवी मुंबई (३८) वि. स्नेहविकास क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (२८).
श्री राम कबड्डी संघ, पालघर (५३) वि. सन्मित्र क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर (२६)
पुरुष गट : नंदकुमार क्रीडा मंडळ, ठाणे (३२) वि. जय भवानी तरुण मंडळ, मुंबई उपनगर (२४)
रेल्वे पोलीस लाईन बॉयस स्पोर्ट्स क्लब, मुं उप (३५) वि. ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब, ठाणे (०६)
नवरत्न क्रीडा मंडळ, ठाणे (२६) वि. श्री विठ्ठल क्रीडा मंडळ, ठाणे (१८)