कदाचित मी पुन्हा कुस्ती खेळेन, लढाई सुरूच राहणार, विजय सत्याचाच होईल - विनेश फोगाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 06:21 AM2024-08-19T06:21:01+5:302024-08-19T06:21:44+5:30
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलोग्रॅम वजनगटात अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र घोषित करण्यात आले होते.
बलाली (हरयाणा) : ‘भारतात परतल्यानंतर मला जे प्रेम मिळते आहे, ते निश्चितच दु:खातून सावरण्यासाठी बळ देणारे आहे. त्यामुळेच कदाचित मी पुन्हा कुस्तीच्या मॅटवर दिसेन,’ असे भारताची स्टार मल्ल विनेश फोगाट हिने सांगितले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलोग्रॅम वजनगटात अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने विनेशला अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यानंतर विनेश शनिवारी मायदेशी परतली.
विनेशने सांगितले की, ‘कुस्तीच्या विकासासाठी भारतीय कुस्ती महासंघाच्या विरोधात सुरू असलेली आमची लढाई आम्ही अजिबात थांबविणार नाही. मला विश्वास आहे की, सत्याचाच विजय होईल. शनिवारी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीपासून आपल्या मूळ गावी बलालीला जाईपर्यंत तिला अनेक चाहत्यांचा पाठिंबा मिळाला शिवाय काही खाप पंचायतींनी तिला सन्मानित केले.
यावेळी विनेश म्हणाली, ‘आपली लढाई अजून संपलेली नाही. हे युद्ध सुरूच राहणार असून, यामध्ये सत्याचा निश्चितच विजय होईल. कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणांवरून विनेशसह बजरंग पुनिया व साक्षी मलिकसारख्या दिग्गज कुस्तीपटूंनी दिल्लीच्या रस्त्यांवर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलन केले होते.
हा सर्वांत मोठा झटका
‘ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊन मुकणे हा माझ्या आयुष्यातला आजपर्यंत सर्वांत मोठा झटका होता,’ असे विनेश म्हणाली. ती पुढे म्हणाली की, ‘यातून सावरायला मला किती वेळ लागेल माहिती नाही. पुन्हा कुस्ती कधी खेळेन हे आताच सांगू शकत नाही. पण चाहत्यांकडून मिळालेले प्रेम सकारात्मक दिशेने जाण्यास मदत करते आहे.’