महापौर बुध्दिबळ ब गट: आंध्रचा पवन विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 08:05 PM2018-06-07T20:05:30+5:302018-06-07T20:05:30+5:30
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमधील इलो २००० गुणाखालील ब गटात आंध्र प्रदेशच्या पवन बी.एन.बी. याने जेतेपद पटकावले.
मुंबई : मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमधील इलो २००० गुणाखालील ब गटात आंध्र प्रदेशच्या पवन बी.एन.बी. याने त्याच्या सोबत सर्वाधिक ८.५ गुण घेणाऱ्या पॉन्डिचेरीच्या श्रीहरी एल. आणि महाराष्ट्राच्या नमित चव्हाण यांना सरस सरासरीच्या बळावर मागे टाकले आणि रुपये एक लाख वीस हजारसह ब गट विजेतेपदाचा महापौर चषक जिंकला. व्हीनस चेस अकॅडमीतर्फे मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना आयोजित स्पर्धेतील द्वितीय क्रमांक श्रीहरी एल. याने व तृतीय क्रमांक नमित चव्हाणने मिळविला.
साखळी शेवटच्या दहाव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर बाराव्या मानांकित पवन बी.एन.बी.ने कोणताही धोका न पत्करता बिगरमानांकित महाराष्ट्राच्या नमित चव्हाण विरुद्ध २० व्या चालीला बरोबरी स्वीकारली आणि दोघांचेही ८.५ गुण झाले. परंतु उत्कृष्ट सरासरीमुळे पवन बी.एन.बी.ने बाजी मारत प्रथम स्थानाच्या विजेतेपदाला गवसणी घातली. दुसऱ्या पटावर देखील विनोद कुमार वि. वैभव भट यांनी सावध खेळ करीत ६३ व्या चालीला बरोबरी मान्य केली. तिसऱ्या पटावर काळ्या मोहरानी खेळतांना श्रीहरी एल.ने ४६ व्या चालीला दहाव्या मानांकित सौरव साहूला नमविले आणि ८.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. विजेत्यांना पुरस्कार अंकित जेम्सचे चेअरमन अरुण शाह, अखिल भारतीय बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले व संयोजक रवींद्र डोंगरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.