महापौर चषक कॅरम स्पर्धा : नवीन पाटिल विजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 09:23 PM2019-03-07T21:23:47+5:302019-03-07T21:24:58+5:30
स्पर्धेत आतापर्यंत तीन ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश नोंदवले गेले.
मुंबई : तथास्तु ग्रुप, नालासोपारा व पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिष्ठेची तिसरी महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीने दोन गेम रंगलेल्या लढतीत माजी पालघर जिल्हा विजेता यंगस्टार्स ट्रस्टच्याच अनिल बोढारेचा २५-१३, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढत उपांत्य फेरी गाठली. तसेच बिनमानांकित प्रगती कॅरम क्लबच्या शरीफ शेखने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात माजी पालघर जिल्हा विजेता प्रगती कॅरम क्लबच्याच संदिप सारसारला २५-१६, २५-१० असे नमवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच सांघिक गटाच्या अंतीम फेरीत समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघाने आपल्याच समाज उन्नती मंडळ ‘अ’ संघावर २-१ ने निसटता विजय मिळवित अजिंक्यपद पटकाविले. पुरुष प्रौढ गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या नवीन पाटीलने दोन तास रंगलेल्या लढतीत वसई क्रिडा मंडळाच्या गणेश फडकेला २५-१४, २५-१२ असे पराभूत करून अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. स्पर्धेत आतापर्यंत तीन ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश नोंदवले गेले.
पुरुष एकेरीच्या रंगलेल्या उप-उपांत्य फेरीच्या इतर लढतीत वसईच्या प्रमोद शर्माने दोन गेम रंगलेल्या लढतीत प्रगती कॅरम क्लबच्या यशवंत कोनाडकरचा २५-१६, २५-१८ असा फाडशा पाडत उपांत्य फेरी गाठली. प्रगती कॅरम क्लबच्या कैलाश वाघेलाने तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात प्रगती कॅरम क्लबच्याच केतन कावाची ६-२५, २५-१०, २५-४ अशी कडवी झुंज मोडीत काढत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
तत्पूर्वी झालेल्या उप-उपांत्य पूर्व फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात माजी पालघर जिल्हा विजेता विश्वनाथ देवरुखकरला बिनमानांकित प्रगती कॅरम क्लबच्या केतन कावाने १३-२५, २५-६, २५-७ असा विजय मिळवित हॉलमधील सर्व प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. तसेच प्रगती कॅरम क्लबच्या शरीफ शेखने तीन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्या मितेश बाबारियाचा १३-२५, २५-८, २५-१६ असा फाडशा पाडत कूच केली. वसईच्या अग्रमानांकित प्रमोद शर्माने दोन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्या नवोदित महेश रायकरचा २५-२१, २५-१३ असा सरळ दोन गेममध्ये नमवित आपले वर्चस्व सिद्ध केले.
पुरुष सांघिक गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघाने समाज उन्नती मंडळ ‘अ’ संघावर २-१ असा निसटता विजय मिळवित अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. पहिल्या एकेरीच्या सामन्यात शरीफ शेखने संदिप सारसारचा सरळ दोन गेममध्ये २५-६, २५-५ असा पराभव करून १-० ची आघाडी मिळवून दिली. नंतरच्या दुसऱ्या सामन्यात स्वप्निल शर्माने दोन गेम रंगलेल्या सामन्यात नमराज जोशीचा २५-७, २५-९ असा फाडशा पाडत २-० ने विजयी आघाडी मिळवून दिली. औपचारिक दुहेरीच्या सामन्यात ईस्माईल शेख / अभिजित गमरे हे यशवंत कोनाडकर / कैलाश वाघेला यांच्याकडून ५-२५, ०-२५ असे पराभूत झाले व समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघाने विजेतेपद पटकाविले. विजेता समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघ १) स्वप्निल शर्मा (कर्णधार), २) शरीफ शेख, ३) विनोद परमार, ४) परितोष बाबारिया, ५) ईस्माईल शेख, ६) अभिजित गमरे, ७) युगांत वाळिंजकर (संघ व्यवस्थापक)