एमसीएला ‘त्या’ खेळाडूची माहितीच नाही

By admin | Published: June 28, 2015 01:54 AM2015-06-28T01:54:06+5:302015-06-28T01:54:06+5:30

नुकत्याच एप्रिल-मे महिन्यात झालेल्या आयपीएलच्या आठव्या सत्रामध्ये राजस्थान रॉयल्सच्या ‘मुंबईकर’ खेळाडूला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता.

MCA does not know about 'that' player | एमसीएला ‘त्या’ खेळाडूची माहितीच नाही

एमसीएला ‘त्या’ खेळाडूची माहितीच नाही

Next

मुंबई : नुकत्याच एप्रिल-मे महिन्यात झालेल्या आयपीएलच्या आठव्या सत्रामध्ये राजस्थान रॉयल्सच्या ‘मुंबईकर’ खेळाडूला फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. दोन महिन्यांहून अधिक वेळ झालेल्या या घटनेनंतरही मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) हा मुंबईकर खेळाडू कोण, हे अद्याप माहीत नाही. विशेष म्हणजे, ज्याने या प्रकरणामध्ये पैशांचे आमिष दाखविले होते तोदेखील मुंबईचा रणजी खेळाडू असल्याने हे प्रकरण त्या वेळी चांगलेच गाजले होते. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रार करणार खेळाडू हा प्रवीण तांबे होता, जो मुंबईचा रणजी खेळाडूदेखील आहे.
यंदाच्या आयपीएलदरम्यान राजस्थान रॉयल्सच्या मुंबईकर खेळाडूशी त्याच्याच रणजी सहकारी खेळाडूने संपर्क साधला होता. संपर्क करणारा हा खेळाडू राजस्थान रॉयल्सचा सदस्य नव्हता, तसेच त्याने त्या वेळी राजस्थानच्या त्या मुंबईकर खेळाडूला पैशांचे आमिष दाखवून फिक्सिंग करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूने याला विरोध करताना तत्काळ बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाकडे (एसीएसयू) तक्रारदेखील केली, तेव्हा हे प्रकरण समोर आले.
या बाबतीत एमसीएचे नवनिर्वाचित संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की या प्रकरणाबाबत बीसीसीआयकडून आम्हाला
कोणतीही सूचना मिळालेली नाही. बीसीसीआयकडून याबाबत योग्य तो तपास झाला असेल किंवा अजूनही त्याचा त्यांचा तपास सुरू असेल. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर आणि राजस्थान रॉयल्सचे सचिव रघू अय्यर यांनी एसएसयूकडे तत्काळ या प्रकरणाची माहिती देणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूचे कौतुक केले होते. (वृत्तसंस्था)

जुन्या आठवणींना उजाळा
या प्रकरणानंतर पुन्हा एकदा २०१३च्या आयपीएल फिक्सिंग वादाची सर्वांना आठवण झाली. त्या वेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतसह राजस्थान रॉयल्सच्या ३ खेळाडूंना अटक करण्यात आली होती. शिवाय, स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. तर, त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन सट्टेबाजीमध्ये आरोपी ठरला होता.

काय म्हणाले होते ठाकूर ?
हे प्रकरण जेव्हा समोर आले, तेव्हा
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते, की राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूशी फिक्सिंगबाबत संपर्क करण्यात आला आहे. ज्या खेळाडूशी संपर्क करण्यात आला होता, त्याने तत्काळ आपल्या संघाच्या व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली आणि व्यवस्थापणाने एसीएसयूला कळविले. यानंतर एसीएसयू या प्रकरणी तपास करीत आहे.

Web Title: MCA does not know about 'that' player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.