मॅक्युलम द्विशतकापासून वंचित
By admin | Published: December 27, 2014 02:10 AM2014-12-27T02:10:55+5:302014-12-27T02:10:55+5:30
ब्रँडन मॅक्युलम केवळ ५ धावांमुळे कसोटी सामन्यातील वेगवान द्विशतक ठोकण्यापासून वंचित राहिला; परंतु त्याच्या वादळी खे
ख्राईस्टचर्च : ब्रँडन मॅक्युलम केवळ ५ धावांमुळे कसोटी सामन्यातील वेगवान द्विशतक ठोकण्यापासून वंचित राहिला; परंतु त्याच्या वादळी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत पहिल्याच दिवशी आज येथे ७ बाद ४२९ अशी मोठी धावसंख्या उभारली.
मॅक्युलमने १३४ चेंडूंत १८ चौकार आणि ११ टोलेजंग षटकारांसह १९५ धावांची स्फोटक खेळी केली. तो कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान द्विशतकी खेळीच्या विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर असताना लाँगआॅफवर झेल देऊन बसला. कसोटी सामन्यात सर्वांत वेगवान द्विशतकाचा विक्रम न्यूझीलंडचाच अन्य एक फलंदाज नाथन अॅस्टल (१५३ चेंडूंत) याच्या नावावर आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले; तथापि, न्यूझीलंडने रुदरफोर्ड (१८), टॉम लॅथम (२७) आणि रॉस टेलर (७) यांना लवकर गमावले. ३ बाद ८८ अशी धावसंख्या असताना खेळपट्टीवर आलेल्या मॅक्युलमने सर्वच समीकरणे बदलून टाकली. त्याने केन विलियम्सन (५४) याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. त्यात विलियम्सनचे योगदान केवळ २0 धावांचे होते.
मॅक्युलमने नंतर जेम्स निशामबरोबर पाचव्या गड्यासाठी १५३ धावांची भागीदारी केली. निशामनेदेखील आपल्या कर्णधाराच्या पावलावर पाऊल ठेवताना आक्रमक फलंदाजी करताना ८0 चेंडूंत ८५ धावा केल्या. त्यात दहा चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दिवसाच्या ८१ व्या षटकात बी. जे. वॉटलिंग (२६) बाद झाल्यानंतर दिवसाचा खेळ संपवण्यात आला, तेव्हा मार्क क्रेग पाच धावांवर खेळत होता.