मॅक्युलमचे नाबाद शतक
By admin | Published: April 11, 2015 11:36 PM2015-04-11T23:36:16+5:302015-04-11T23:36:16+5:30
ब्रेंडन मॅक्युलम आयपीएलच्या आठव्या पर्वात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज विजयी : सनरायझर्स हैदराबाद ४५ धावांनी पराभूत
चेन्नई : ब्रेंडन मॅक्युलम आयपीएलच्या आठव्या पर्वात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. मॅक्युलमच्या शतकी खेळीच्या (नाबाद १००) जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने इंडियन प्रिमीअर लीग स्पर्धेत शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत सनराइजर्स हैदराबाद संघाचा ४५ धावांनी पराभव केला. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.
चेन्नई सुपरकिंग्जने ४ बाद २०९ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या हैदराबाद सनराइजर्स संघाचा डाव ६ बाद १६४ धावांत रोखला. हैदराबाद संघातर्फे कर्णधार डेव्हिड वॉर्नरची (५३) अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. सुपरकिंग्ज संघातर्फे ड्वेन ब्राव्हो व मोहित शर्मा यांनी अनुक्रमे २५ व ३६ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. रविचंद्रन आश्विनने ४ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सनराइजर्स संघ कधीच लक्ष्य गाठण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून आले नाही. संघाचा माजी कर्णधार शिखर धवनने (२६) आशिष नेहराच्या पहिल्याच षटकात दोन चौकार ठोकून चांगली सुरुवात केली; पण मोहित शर्माने त्याचा अडथळा दूर करून सुपरकिंग्ज संघाला पहिले यश मिळवून दिले. मोहितने त्यानंतर लोकेश राहुल (५) याला तंबूचा मार्ग दाखविला. नमन ओझाला (११ चेंडू, १५ धावा) मोठी खेळी करण्यात अपयश आले. सलामीवीर कर्णधार वॉर्नरने ४१ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक साजरे केले. त्याचा उडालेला झेल सीमारेषेवर तैनात ड्वेन स्मिथने टिपला. संघाला अखेरच्या ५ षटकांत ९५ धावांची गरज होती. रवी बोपाराने (२२) रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकून निर्धार जाहीर केला; पण ड्वेन ब्राव्होने त्याला बाद करून चेन्नई संघाचा विजय निश्चित केला. केन विलियम्सन २६ धावा काढून नाबाद राहिला.
त्याआधी, ब्रँडन मॅक्युलमने टी-२० क्रिकेटमध्ये झळकावलेल्या सहाव्या शतकाच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने ४ बाद २०९ धावांची दमदार मजल मारली. मॅक्युलम आयपीएलमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक शतके ठोकणारा सहावा फलंदाज ठरला आहे. मॅक्युलमने ५६ चेंडूंना सामोरे जाताना ९ षटकार व ७ चौकारांच्या साह्याने नाबाद १०० धावांची खेळी केली. त्याने डावातील शेवटच्या षटकात न्यूझीलंड संघातील सहकारी ट्रेंट बोल्टच्या ओव्हरमध्ये अखेरच्या तीन चेंडूंवर षटकार, चौकार व एक धाव घेऊन शतक पूर्ण केले. मॅक्युलमने सलामीवीर ड्वेन स्मिथसोबत (२७) सलामीला ७५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर सुरेश रैना (१४) व कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५३) यांच्यासोबत अनुक्रमे ६० व ६३ धावांची भागीदारी केली. धोनीने आक्रमक फलंदाजी करताना २९ चेंडूंमध्ये ४ षटकार व ४ चौकारांच्या साह्याने अर्धशतक झळकावले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या चेन्नई संघाला स्मिथ व मॅक्युलम यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. मॅक्युलमने भुवनेश्वर कुमार, कर्ण शर्मा व ईशांत शर्मा यांच्या गोलंदाजीवर षटकार वसूल केले. मॅक्युलम व स्मिथ यांनी संघाला सातव्या षटकात अर्धशतकाची वेस ओलांडून दिली. स्मिथ चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.
(वृत्तसंस्था)
चेन्नई सुपरकिंग्ज :- ड्वेन स्मिथ धावबाद २७, ब्रँडन मॅक्युलम नाबाद १००, सुरेश रैना धावबाद १४, महेंद्रसिंह धोनी झे. वॉर्नर गो. बोल्ट ५३, रवींद्र जडेजा धावबाद ०, ड्वेन ब्राव्हो नाबाद ०. अवांतर : १५. एकूण : २० षटकांत ४ बाद २०९. बाद क्रम : १-७५, २-१३५, ३-१९८, ४-१९८. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३१-०, बोल्ट ४-०-३४-१, ईशांत ३-०-४६-०, कर्ण ४-०-५१-०, बोपारा ४-०-२९-०, रसूल १-०-११-०.
सनराइजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर झे. स्मिथ गो. पांडे ५३, शिखर धवन झे. जडेजा गो. मोहित २६, लोकेश राहुल त्रि. गो. मोहित ५, नमन ओझा झे. मोहित गो. आश्विन १५, रवी बोपारा त्रि. गो. ब्राव्हो २२, केन विलियम्सन नाबाद २६, कर्ण शर्मा झे. रैना गो. ब्राव्हो ४, परवेझ रसूल नाबाद २,अवांतर : ११, एकूण : २० षटकांत ६ बाद १६४ धावा. गडी बाद क्रम : १/३०, २/४६, ३/९१,७/११४, ५/१३६, ६/१५०.गोलंदाजी : आशिष नेहरा ४-०-३१-०, मोहित शर्मा ४-०-३६-२, ईश्वर पांडे ३-०-२६-१, रविचंद्रन आश्विन ४-०-२२-१, ड्वेन ब्राव्हो ४-०-२५-२, रवींद्र जडेजा १-०-१७-०.