पदक मिळविले, पण मोबाइल गेला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:47 AM2019-01-21T02:47:01+5:302019-01-21T02:47:13+5:30
सेनादलाच्या नितेंद्रसिंग रावत याने मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात सुवर्ण पटकावले.
- रोहित नाईक
मुंबई : सेनादलाच्या नितेंद्रसिंग रावत याने मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात सुवर्ण पटकावले. यासह त्याने ५ लाख रुपयांच्या रोख पुरस्कारावरही कब्जा केला. मात्र, यानंतरही तो काहीसा निराश होता. कारण स्पर्धेदरम्यान त्याचा मोबाइलच गहाळ झाला. यामुळे सोशल मीडियावर कायम ‘अॅक्टिव्ह’ असणाऱ्या नितेंद्रसिंगला आपल्या विजयाची पोस्ट टाकता येत नव्हती आणि हेच त्याच्या निराशेमागचे मुख्य कारण होते.
गेल्या काही स्पर्धांमध्ये खालावलेल्या कामगिरीमुळे नितेंद्रसिंगवर अनेकांनी टीकेचा भडिमार केला होता. यासाठीच मुंबई मॅरेथॉनच्या दोन दिवसआधी त्याने सोशल मीडियावर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते. मात्र, मॅरेथॉनदरम्यानच मोबाइल गहाळ झाल्याने, विजयी कामगिरीची माहिती सोशल मीडियावर टाकता न आल्याने सुवर्ण पटकावल्यानंतरही नितेंद्र निराश झाला.
‘मॅरेथॉनदरम्यान मोबाइल प्रशिक्षकांकडे दिलेला मोबाईल कुठेतरी गहाळ झाला,’ असे नितेंद्रने सांगितले. याविषयी नितेंद्रने अधिक सांगितले की, ‘मला माझ्या वेळेत सुधारणा करायची होती. माझ्या खालावलेल्या कामगिरीमुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली होती, त्यांना मला चोख उत्तर द्यायचे होते. यासाठीच मी मुंबई मॅरेथॉनआधी फेसबुकवर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते, पण दुर्दैवाने माझा मोबाइल हरवल्याने, मी जिंकल्यानंतरही फेसबुकवर पोस्ट टाकू शकलो नाही. मला मोबाइल गेल्याचे दु:ख नसून, सोशल मीडियावर अद्याप मी माझे अपडेट टाकू शकत नाही, याचे दु:ख जास्त आहे.’
त्याचप्रमाणे, ‘या विजेतेपदानंतर माझ्या टीकाकारांना नक्कीच चोख उत्तर मिळाले असणार. मी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. त्यामुळेच अजून पोस्ट टाकता न आल्याने निराश आहे, पण लवकरच माझी पोस्ट अपलोड होईल. आता मी दुसºया फोनचा वापर करेन, पण त्यासाठी मला सर्व अॅप पुन्हा डाउनलोड करावे लागतील,’ असेही नितेंद्रने म्हटले.
>लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला!
यंदा मुंबई मॅरेथॉन मार्गात थोडा बदल करण्यात आला होता, तसेच सुरुवातीला आणि अंतिम क्षणी लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय धावताना मार्गात काही हौशी धावपटूंचा अडथळाही झाला. बाइकर्सही आमच्या मधेमधे येते असल्याने अनेकदा गर्दीतून आम्ही मार्ग काढला. याशिवाय आम्हाला कुठेही अडचण आली नाही, पण हे होतच असते. - नितेंद्रसिंग रावत