आशियाडसाठी दोन आठवड्यांत सज्ज होऊ शकते- मीराबाई चानू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:15 AM2018-07-26T01:15:16+5:302018-07-26T01:15:27+5:30
दुखापत गंभीर नसल्याचा खुलासा; तयारीसाठी पुरेसा कालावधी
नवी दिल्ली : पाठीच्या दुखण्यामुळे आशियाडमधील समावेशावर प्रश्नचिन्ह लागल्यानंतरही विश्व चॅम्पियन आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती भारोत्तोलक सेखोम मीराबाई चानू हिने या स्पर्धेसाठी दोन आठवड्यांत सज्ज होण्याचा निर्धार व्यक्त केला. पाठीचे दुखणे तितके गंभीर नसून तयारीसाठी केवळ दोन आठवड्यांची तयारी पुरेशी असल्याचे मीराबाईचे मत आहे. ती ४८ किलो वजन गटात आव्हान सादर करते. सध्या ती पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात कमरेच्या वरच्या भागाचा सराव करीत आहे. पुढील दोन आठवड्यांत मणिपूरच्या २३ वर्षांच्या मीराबाईच्या खेळण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
२५ मे रोजी तिच्या पाठीत दुखणे उमळले होते. देशभरातील अनेक डॉक्टर दुखण्यावर तोडगा शोधण्यात अपयशी ठरले. दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी तिने उपचार केले; पण रिपोर्ट नॉर्मल आल्याने दुखण्याचे कारण कळले नव्हते. एक्सरे मध्येही काहीच निष्पन्न होऊ शकले नाही.
इंडोनेशियात १८ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या आशियाडला एक महिन्यापेक्षा कमी वेळ असून, मीराबाईला मात्र दोन आठवड्यांत सज्ज होण्याचा विश्वास वाटतो. व्यायाम सुरू असल्याने दुखणे कमी झाल्याचे लक्षात आले आहे. दोन-तीन आठवड्यांत मी वजन उचलू शकेन, असे मीराबाई म्हणाली. नोव्हेंबर महिन्यात मीराबाईने विश्व चॅम्पियनशिपमध्ये २२ वर्षांत भारतासाठी पहिले सुवर्ण जिंकले. तिने १९४ किलो वजन उचलले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही राष्टÑीय विक्रमासह १९६ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. (वृत्तसंस्था)
‘‘आशियाडमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे. भारोत्तोलनात चीन, जपान, थायलंड, कझाखस्तानसारखे देश आघाडीवर असल्याने कडवी स्पर्धा असेल.’’
- मीराबाई चानू, भारोत्तोलक.