मीराबाईने आशियाडमध्ये सहभागी होऊ नये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 04:02 AM2018-08-07T04:02:42+5:302018-08-07T04:02:55+5:30
विश्व चॅम्पियन भारोत्तोलनपटू मीराबाई चानू हिच्या आशियाडमधील सहभागाविषयी शंका आहे.
नवी दिल्ली : विश्व चॅम्पियन भारोत्तोलनपटू मीराबाई चानू हिच्या आशियाडमधील सहभागाविषयी शंका आहे. देशाचे मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाईच्या फिटनेसविषयी चिंता व्यक्त करीत जकार्ता स्पर्धेतून माघार घ्यावी आणि नोव्हेंबरमध्ये आयोजित आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.
सध्याची विश्व चॅम्पियन मीराबाईच्या पाठीच्या खालच्या भागात मे महिन्यात दुखणे उमळले होते. ही समस्या कायम असून वजन उचलण्याचा सराव करताना त्रास होत आहे. मागच्या आठवड्यात दुखणे बरे वाटू लागताच मीराबाईने मुंबईत सरावास सुरुवात केली होती. कालपासून पुन्हा दुखण्याने उचल खाल्ली. याविषयी विजय म्हणाले,‘मी महासंघाला अहवाल दिला आहे. आता महासंघाने निर्णय घ्यावा. इतक्या कमी वेळात अधिक वजन उचलणे योग्य नाही. आॅलिम्पिक पात्रता फेरीवर लक्ष दिल्यास देशाचा लाभ होईल. आॅलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन १ नोव्हेंबरपासून होईल. मीराबाईच्या लिगामेंटमधील जखम अतिशय लहान असल्याने एमआरआय आणि सिटीस्कॅनद्वारे शोध घेता आला नाही. ’ दरम्यान भारोत्तोलन महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी मीराबाईला खेळविण्याचा निर्णय गुरुवारी होईल, असे सांगितले. (वृत्तसंस्था)
.मीराबाई आशियाडमध्ये सुवर्ण पदकाची प्रबळ दावेदार असल्याने तिच्या माघारीमुळे मोठे नुकसान होणार आहे. मणिपूरच्या या खेळाडूने मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये विश्व स्पर्धेच्या ४८ किलो गटात १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत तिने सर्वोत्कृष्ट कामगिरीसह राष्टÑीय विक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदक पटकविले होते.