पुरुष, महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Published: February 18, 2016 06:30 AM2016-02-18T06:30:59+5:302016-02-18T06:30:59+5:30
भारतीय बॅडमिंटनपटूंनी जबरदस्त कामगिरी करीत सिंगापूरचा फडशा पाडला. पुरुष संघाने सिंगापूरवर ५-० ने मात केली.
हैदराबाद : भारतीय बॅडमिंटनपटूंनी जबरदस्त कामगिरी करीत सिंगापूरचा फडशा पाडला. पुरुष संघाने सिंगापूरवर ५-० ने मात केली. या शानदार सुरुवातीनंतर भारताने बॅडमिंटन आशियाई टीम चॅम्पियनशिपमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ‘अ’ गटात भारतासोबतच चीनचाही समावेश आहे. या स्पर्धेत तीन एकेरी आणि दोन दुहेरी सामने आहेत. भारतासाठी किदांबी श्रीकांतने सुरुवात केली. गचीबाउली स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याने झि लियांग डेरेक वॉँगचा २१-१६, १२-२१, २१-१३ ने पराभव केला. वॉँगने संघर्ष केला. मात्र, नवव्या क्रमांकावरील श्रीकांतने पुनरागमन करीत सामना जिंकला. दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात, अजय जयरामने किन यू लो याचा २१-११, २१-१८ ने पराभव केला. त्यानंतर भारताने दोन्ही दुहेरीतील सामने जिंकले. मनू अत्री आणि सुमित रेड्डी या जोडीने टॅरी ही आणि किन हिन लो या जोडीचा २१-१५, २१-१४ ने पराभव केला.
महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या पीव्ही सिंधू हीने सिंगापूरच्या शियायू लियांगला २१-१७, २१-११ अशी मात दिली. शायायूने पहिल्या गेममध्ये कडवी झुंज दिली. मात्र सिंधूने दुसरा गेम सहज खिशात घालत विजय मिळविला. सिंधूने दुहेरीत सिक्की रेड्डी हीच्या साथीत सिगांपूरच्या जिया मिंग क्रिस्टल वोंग व जिया मिन यिओ या जोडीवर २१-८, २१-१४ असा विजय मिळवित आगेकूच केली.