India vs Pakistan Hockey Asia Cup 2022 : ५० मिनिटे राखलेली आघाडी भारताने क्षणात गमावली, पाकिस्तानने अखेरच्या मिनिटाला बरोबरी मिळवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:45 PM2022-05-23T18:45:16+5:302022-05-23T18:47:03+5:30

India vs Pakistan Men's Hockey Asia Cup: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत झाला.

Men's Hockey Asia Cup 2022 : Heartbreak for India. Pakistan with an equalizer with one minute left and the match ends in a draw in their first match of the Asia Cup 2022. | India vs Pakistan Hockey Asia Cup 2022 : ५० मिनिटे राखलेली आघाडी भारताने क्षणात गमावली, पाकिस्तानने अखेरच्या मिनिटाला बरोबरी मिळवली

India vs Pakistan Hockey Asia Cup 2022 : ५० मिनिटे राखलेली आघाडी भारताने क्षणात गमावली, पाकिस्तानने अखेरच्या मिनिटाला बरोबरी मिळवली

Next

India vs Pakistan  Men's Hockey Asia Cup: जकार्ता येथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा पहिलाच सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत झाला. दक्षिण कोरियाने आशिया चषक सर्वाधिक चार ( १९९४, १९९९, २००९ व २०१३) वेळा जिंकला आहे. भारत ( २००३, २००७ व २०१७) आणि पाकिस्तान ( १९८२, १९८५ व १९८९) यांनी प्रत्येकी तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. आजच्या लढतीआधी भारत-पाकिस्तान यांच्यातली जय-पराजयाची आकडेवारी ही २८-२५ अशी राहिली आहे आणि पाच सामने ड्रॉ राहिले आहेत. आजचा सामना चुरशीचा झाला. ८व्या मिनिटाला भारताने घेतलेली आघाडी पुढील ५० मिनिटे टिकून राहिली होती, परंतु पाकिस्तानकडून अखेरच्या मिनिटाला बरोबरीचा गोल झाला. 


पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीच्या पाच मिनिटांत दोन्ही संघांना २-२ पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु गोल करण्यात दोघंही अपयशी ठरले. भारतीय संघात बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. ज्युनियर वर्ल्ड कप विजेत्या संघातील १० खेळाडू या स्पर्धेतून सीनियर संघात पदार्पण करत आहेत. पाकिस्तानविरुद्ध या नव्या दमाच्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली आणि चेंडूवर ताबा राखताना पाकिस्तानला बॅकफूटवर ठेवले. ८व्या मिनिटाला सेलवम कार्थीने पेनल्टी कॉर्नवर गोल केला आणि सीनियर संघाकडून पदार्पण दणक्यात केले. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये १-० ही आघाडी कायम राखली.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानकडून पहिल्याच मिनिटाला आक्रमण झाले. पाकिस्तानी खेळाडू चेंडू सर्कलमध्ये घेऊन पोहोचले होते, परंतु अखेरच्या क्षणाला त्यांना रोखले गेले. पाकिस्तानचा संघ चेंडूवर ताबा राखून सावध खेळावर भर देताना दिसला. त्यांच्या या रणनीतीला भारतीय खेळाडूंनी लाँग पास देऊन उत्तर देण्याचा प्रयत्न केला. २०व्या मिनिटाला पाकिस्तानच्या खेळाडूंनी बरोबरीचा गोल केलाच होता, परंतु गोलरक्षक सुरज करकेरा आडवा आला. त्यानंतरही अफराजला गोल करण्याची संधी होती, परंतु त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला.

२१व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला अन् यावेळेस पाकिस्तानचा गोलरक्षक अकमल हुसैन याने चेंडू अडवला. २८व्या मिनिटाला भारतीय गोलरक्षकाने सुरेख बचाव केला. पण, त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्यांच्यातच समन्वयाचा अभाव दिसला आणि चेंडूवरील ताबा त्यांनी गमावला. भारताने पहिल्या हाफमध्ये १-० अशी आघाडी कायम राखली. भारताने पहिल्या ३० मिनिटांत ४ ऑन टार्गेट प्रयत्न केले, तर ४ पैकी १ कॉर्नरवर गोल करण्यात यश मिळवले. 


दुसऱ्या हाफमध्ये पहिल्याच मिनिटाला पाकिस्तानने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. छोटे पण अचूक पास करत पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना दडपणात ठेवले. त्याच जोरावर ३३व्या मिनिटाला अब्दुल राणा गोलजाळीच्या समोर जाऊन पोहोचला होता, परंतु करकेराने पुन्हा एकदा सुरेख बचाव केला. ३८व्या मिनिटाला पाकिस्तानी गोलीने भारताचा दुसरा गोल अडवला, परंतु कॉर्नर मिळवण्यापासून त्यांना रोखू शकला नाही. पण, पाकिस्तानी गोली मजबूत भिंतीसारखा उभा राहिला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या वर्तुळावर सातत्याने आक्रमण केले. ४१व्या मिनिटाला पुन्हा पाकिस्तानने संधी गमावली. भारतालाही सातत्याने कॉर्नर मिळूनही आघाडी अधिक मजबूत करता येत नव्हती. 

चौथ्या क्वार्टरमध्ये करकेराने आणखी एक अप्रतिम बचाव केला. अखेरच्या क्षणाला गोल करण्यात अपयश येताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंची चिडचिड झालेली दिसली. पण, ५८व्या मिनिटाला अब्दुल राणाने गोल केला. हा सामना १-१असा बरोबरीत सुटला. 
 

Web Title: Men's Hockey Asia Cup 2022 : Heartbreak for India. Pakistan with an equalizer with one minute left and the match ends in a draw in their first match of the Asia Cup 2022.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.