मरियप्पनची ‘सुवर्ण’ उडी
By admin | Published: September 11, 2016 12:49 AM2016-09-11T00:49:51+5:302016-09-11T00:49:51+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे
रिओ : रिओ आॅलिम्पिकमध्ये देशासाठी एकतरी सुवर्णपदक मिळवण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न अपूर्ण राहिले असले तरी ही कसर आता रिओ पॅरालिम्पिकमध्ये भरून निघाली आहे. मरियप्पन थंगवेलू याने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी उंचउडी प्रकारात सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात तिसऱ्या स्थानावर राहिलेला उत्तर प्रदेशचा २१ वर्षांचा वरुणसिंग भाटी कांस्यपदकाचा मानकरी ठरला. तो एका पायाने पोलिओग्रस्त आहे.
मरियप्पन व वरुणच्या या कामिगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भारतीयांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पाच वर्षांच्या वयात शाळेत जातेवेळी भरधाव बसने धडक देताच उजवा पाय गमावून बसलेल्या २१ वर्षांच्या थंगवेलूने १.८९ मीटर ऐतिहासिक उंच उडी घेत सुवर्ण जिंकले. या प्रकारात भारताला सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी १९७२ च्या हेडेलबर्ग स्पर्धेत जलतरणात मुरलीकांत पेटकर तसेच २००४ च्या अथेन्स स्पर्धेत भालाफेकीत देवेंद्र झांझरिया याने भारतासाठी सुवर्णमय कामगिरी केली होती.
विशेष म्हणजे या प्रकारात सुवर्णपदकाचा दावेदार मानला जाणारा अमेरिकेचा खेळाडू सॅम ग्रीव्ह याला मात्र (१.८६ मीटर) रौप्य मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे कांस्य पदक पटकावणारा वरुण भाटी याने सुध्दा १.८६ मीटर मीटर उंच उडी मारली. पण काऊंटबॅकमध्ये त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले. टी ४२ गटात शरीराच्या खालच्या भागात अक्षमता, पायाची लांबी कमी असणे किंवा जोर नसणे आदी प्रकाराचा समावेश आहे. थंगवेलू याने दहाव्या प्रयत्नांत १.७७ मीटर उडी घेतली. पोलंडचा लुकास मामजाज, चीनचा झिकियांग झिंग आणि भाटी यांनी देखील १.७७ मीटर उडी घेतली.
नंतरच्या प्रयत्नांत केवळ तीन स्पर्धक उरले होते. भाटीने १.८३ मीटर उडी घेताच सुवर्ण व रौप्य भारतालाच मिळेल, असे वाटत होते पण अमेरिकेच्या खेळाडूने १.८६ मीटर उंच उडी घेत पुन्हा एकदा लक्ष वेधले. रोमहर्षक फायनलमध्ये थंगवेलू याने १.८९ मीटर उडी घेत सुवर्णावर नाव कोरले. थंगवेलू आणि भाटी यांच्या कामगिरीनंतर पॅरालिम्पिकमधील भारतीय पदकांची संख्या दहा झाली आहे. त्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. यंदा १९ खेळाडू रिओमध्ये सहभागी झाले आहेत. (वृत्तसंस्था)
मरियप्पनला तमिळनाडू सरकारचे दोन कोटी!
चेन्नई : रिओ पॅरालिम्पिकच्या उंचउडीत टी-४२ प्रकारात सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू याला तमिळनाडू सरकारने दोन कोटी रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी श्निवारी राज्य शासनाच्यावतीने थंगवेलू याला दोन कोटी रुपये देण्याचे जाहीर केले.
क्रीडा खात्याचे ७५ लाख!
पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ७५ लाख, रौप्य जिंकणाऱ्याला ५० तर कांस्यपदक जिंकणाऱ्याला
३० लाख रु पये देण्यात येणार असल्याचे क्र ीडा मंत्रालयाने
यापूर्वीच जाहीर केले होते.
पॅरालिम्पिकविरांवर अभिनंदनाचा वर्षाव
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांच्यासह अनेक मान्यवरांनी रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंचउडीत सुवर्ण आणि कांस्य विजेते भारतीय खेळाडू मरियप्पन थंगवेलू तसेच वरुणसिंग भाटी यांचे अभिनंदन केले आहे.
’’
नेमबाज अभिनव बिंद्रा म्हणाला, ‘मरियप्पन सुवर्ण विजेत्यांच्या क्लबमध्ये तुझे स्वागत आहे’.
’’
रिओ आॅलिम्पिकच्या महिला कुस्तीत कांस्य विजेती साक्षी मलिक हिने लिहिले, ‘हे दोन्ही खेळाडू अन्य खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहेत. भारतात प्रतिभेची उणीव नाही. मरियप्पन व भाटी आपले शतश: अभिनंदन!!’
’’
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मरियप्पन थंगवेलू आणि वरुणसिंग भाटी यांच्या कामगिरीचे कौतुक केले. ममता बॅनर्जी यांनी टिष्ट्वट करीत दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले. नितीश कुमार यांनीही खेळाडूंची पाठ थोपटून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
’’
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करीत भारतात पुन्हा एकदा उत्सवाचे वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे.
’’
भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार वीरेन रासकिन्हा यांनी यापेक्षा मोठी प्रेरणा असूच शकत नाही. मरियप्पनची कामगिरी फार मोठी असल्याची प्रतिक्रिया दिली.
’’
बीजिंग आॅलिम्पिकचा कांस्य विजेता बॉक्सर विजेंदरसिंग म्हणाला, ‘आॅलिम्पिकपदक विजेत्या सिंधू आणि साक्षी यांना देशाने जो सन्मान दिला तसाच रोख पुरस्कार व सन्मान मरियप्पन आणि भाटी यांना मिळावा, अशी अपेक्षा आहे.’
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, हे यश मोठे गौरवास्पद आहे, यातून देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणा मिळेल. अभिनंदन आणि शुभेच्छा !
मोदी यांनी टिष्ट्वट संदेशात या विजयाने देश गौरवान्वित झाला, असे म्हटले आहे. गोयल यांनी या दोन्ही खेळाडूंची मुक्तकंठाने पाठ थोपटली.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या, ‘आज ऐतिहासिक दिवस आहे. दोन्ही खेळाडूंची अद्भूत कामगिरी भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल.’
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता म्हणाल्या, ‘थंगवेलू याने शारीरिक अपंगात्वर मात करीत राज्याचे आणि देशाचे नाव उंचावले. मरियप्पनची कामगिरी युवकांना प्रेरणादायी ठरेल. ’