मेस्सी @ ५००
By admin | Published: November 8, 2016 03:41 AM2016-11-08T03:41:49+5:302016-11-08T03:41:49+5:30
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेज यांनी केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर स्पॅनिश चॅम्पियन बार्सिलोना एफसीने ला लीगा स्पर्धेत सेविलाविरुद्ध २-१ असा विजय मिळविला
माद्रिद : अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेज यांनी केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर स्पॅनिश चॅम्पियन बार्सिलोना एफसीने ला लीगा स्पर्धेत सेविलाविरुद्ध २-१ असा विजय मिळविला. यासोबतच मेस्सीने बार्सिलोनासाठी आपले ५०० गोल देखील पूर्ण केले. विशेष म्हणजे, मेस्सी व सुआरेज यांच्यामुळे गेल्या सहा दिवसांतील दुसरा पराभव टाळण्यात बार्सिलोनाला यश आले.
या विजयानंतर बार्सिलोनाने रेयाल माद्रिदमधील अंतर दोन गुणांनी कमी केले. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोनाला मँचेस्टर सिटीविरुद्ध १-३ असा मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, सेविलाविरुद्ध बार्सिलोनाच्या दिग्गज खेळाडूंनी आपला हिसका दाखविताना दमदार विजय नोंदविला. दरम्यान, सामन्याच्या पहिल्या सत्रात सेविलाने वर्चस्व राखत बार्सिलोनाला दबावाखाली ठेवले होते.
आक्रमक सुरुवात केलेल्या सेविलाने पहिल्या ५० सेकंदांमध्येच गोल करण्याच्या दोन संधी निर्माण केल्या. तर, यानंतर सुआरेज व नेमार यांनी सेविलाचे बचाव भेदण्यात यश मिळवले. मात्र, सर्जियो रिको याने दोघांचे आक्रमण रोखले.
पहिल्या सत्रात केलेल्या आक्रमक खेळाचा फायदा सेविलाला झाला आणि १५व्या मिनिटाला पाब्लो सारबियाने दिलेल्या उत्कृष्ट पास सर्जी रॉबर्टोने विटोलोकडे दिला आणि त्यावर विटोलोने शानदार गोल करून संघाला १-० असे आघाडीवर नेले.
यानंतर, मात्र बार्सिलोनाने आपला वेगवान खेळ करताना मेस्सी आणि सुआरेज यांच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले. मध्यांतराच्या दोन मिनिटआधी मेस्सीने नेमारच्या कॉर्नर पासवर चेंडूला गोलजाळ्याची दिशा देत संघाला बरोबरी साधून दिली. आपल्या संघासाठी मेस्सीने केलेला हा ५०० वा गोल ठरला.
मध्यंतरानंतर, बार्सिलोनाने आपला धडाका कायम राखला. यावेळी सुआरेजने सूत्रे आपल्याकडे घेताना मेस्सीकडून मिळालेल्या पासवर रिकोला चकमा देत बार्सिलोनाचा विजयी गोल साकारला. यानंतर, पुन्हा एकदा सुआरेजने गोल करण्याची सुवर्ण संधी निर्माण केली. परंतु, रिकोने त्याला रोखले आणि अखेरपर्यंत आघाडी कायम राखत बार्सिलोनाने बाजी मारली.