मानसिकदृष्ट्या दोन्ही संघ बरोबरीत
By admin | Published: March 21, 2017 01:05 AM2017-03-21T01:05:56+5:302017-03-21T01:05:56+5:30
रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते.
रांचीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. शेवटचा दिवस उजाडला, तेव्हा भारत हा सामना जिंकेल असे वाटत होते. कारण, चौथा दिवस संपता संपता भारताने आॅस्ट्रेलियाचे दोन गडी बाद करुन, त्यांच्यावर थोडे दडपण आणले होते. त्यात सकाळी पहिल्या सत्रात भारतासाठी या मालिकेत सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलेला स्टिव्ह स्मिथ आणि सलामीवीर रेनशॉ हे दोघेही लवकर बाद झाले, त्यामुळे भारतीय गोलंदाज आज जलवा दाखवणार असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही. शॉन मार्श आणि पीटर हॅँड्सकोंब यांच्यात झालेल्या जबरदस्त भागीदारीमुळे भारताला विजयापासून वंचित राहावे लागले.
हँड्सकोब, रेनशॉ, कमिन्स यासारखे युवा खेळाडू हे भारत दौऱ्यातून आॅस्ट्रेलियाला मिळालेली देणगी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करुन ते संघात आपले स्थान पक्के करीत आहेत. आॅस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत ठेवून मोठे यश तर मिळवले आहेच, शिवाय बंगलोर कसोटीतील विजयामुळे भारताला जी मानसिक आघाडी मिळाली होती, ती आता बरोबरीत आली आहे. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी दोन्ही संघ जेव्हा धरमशाला येथे जातील तेव्हा दोघेही समान पातळीवर असतील.
कसोटी अनिर्णीत राहिल्यामुळे भारतीय चमू निराश झाला असला, तरी या सामन्यातून भारताला बरेच काही गवसले आहे. चेतेश्वर पुजारा हा खेळाडू किती महान आहे, याची प्रचिती या सामन्यातून आली. दबावाच्या वेळी तो मैदानात तंबू ठोकून उभा राहिला नसता, तर आॅस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळाली असती, अशी परिस्थिती होती. परंतु, त्याने आपल्या फलंदाजीने आॅस्ट्रेलियाची धावसंख्या मागे टाकून भारताला दीडशेच्यावर आघाडी मिळवून दिली. यावरुन तो किती मोठा खेळाडू आहे त्याची कल्पना येते. याशिवाय वृद्धिमान साहा हा सुध्दा या मालिकेतून भरवशाचा फलंदाज म्हणून उदयास येत आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या मोठ्या खेळाडूची जागा त्याला भरुन काढायची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण, संपूर्ण हंगामात त्याने चांगली कामगिरी करुन धोनीची उणीव जाणवणार नाही याची काळजी घेतली आहे. रवींद्र जडेजाने आपली अष्टपैलू खेळाडू म्हणून छाप आणखी पक्की केली आहे. या खेळपट्टीवर ९ बळी घेणे कठीण कामगिरी आहे. परंतु, गोलंदाजीतील सातत्य त्याने दाखवून दिले आहे. त्याचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होत असते, फलंदाजीत तो परिस्थितीनुसार गिअरअप करतो. त्याचे चौथ्या दिवसाचे जलद अर्धशतक भारतासाठी महत्त्वपूर्ण होते. तो अष्टपैलू म्हणून प्रगल्भ होत आहे, हे मात्र निश्चित. रविचंद्रन आश्विनला या मालिकेत जास्त बळी मिळवता आले नसले तरी गेल्या दोन हंगामात त्याने केलेली कामगिरी विसरुन चालणार नाही. त्याला लगेच दोषी ठरवून चालणार नाही, पुढे धरमशालामध्ये काय होतंय ते पाहुया.