बलाढ्य मुंबई विजयी मार्गावर

By admin | Published: March 9, 2016 05:26 AM2016-03-09T05:26:05+5:302016-03-09T05:26:05+5:30

रणजी विजेत्या मुंबईकरांनी इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना शेष भारत संघाचा डाव ३०६ धावांवर संपुष्टात आणून २९७ धावांची मजबूत आघाडी घेतली.

The mighty Mumbai on the winning track | बलाढ्य मुंबई विजयी मार्गावर

बलाढ्य मुंबई विजयी मार्गावर

Next

मुंबई : रणजी विजेत्या मुंबईकरांनी इराणी ट्रॉफी सामन्यावर मजबूत पकड मिळवताना शेष भारत संघाचा डाव ३०६ धावांवर संपुष्टात आणून २९७ धावांची मजबूत आघाडी घेतली. यानंतर फलंदाजीला उतरल्यावर सलामीवीर अखिल हेरवाडकर लगेच परतल्याने मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २ धावा अशी अडखळती सुरुवात केली.
ब्रेबॉन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात अभिषेक नायर (३/३५), जय बिस्ता (२/५२) आणि इक्बाल अब्दुल्ला (२/६२) यांनी केलेल्या टिच्चून माऱ्यापुढे शेष भारताचा डाव मर्यादित राहिला. करुण नायरने झुंजार खेळी करताना संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचे शतक केवळ ६ धावांनी हुकले. १९२ चेंडूंचा सामना करताना करुणने ११ चौकारांसह ९४ धावांची शानदार खेळी केली. त्याचप्रमाणे अखेरच्या फळीमध्ये शेल्डॉन जॅक्सन (३७) आणि जयदेव उनाडकट (४८) यांनी केलेल्या झुंजार खेळीमुळे शेष भारताला ३००ची मजल मारता आली.
तसेच अंकित राजपूत गुडघा दुखावल्याने फलंदाजीला न उतरल्यानेही शेष भारताच्या डावावर परिणाम झाला. करुण नायरने चांगली खेळी करीत असताना धवल कुलकर्णीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयश अय्यरकडे झेल दिला. या चुकीमुळे शेष भारताला मोठा फटका बसला. करुण बाद होणारा अखेरचा फलंदाज ठरला. त्याला खालच्या फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली. तिसऱ्या दिवसाची सुरुवात १ बाद ३६ या धावसंख्येवरून करणाऱ्या शेष भारताने ठरावीक अंतराने आपले फलंदाज गमावले. ७ बाद २०१ धावा अशा अवस्थेनंतर करुणने आठव्या विकेटसाठी उनाडकटसह ९१ धावांची भागीदारी केली. अभिषेक नायरने उनाडकटला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर मुंबईने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले. धवल कुलकर्णी व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक मात्र निर्णायक बळी घेत मुंबईसाठी मोलाचे योगदान दिले.
> संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : सर्वबाद ६०३ धावा. शेष भारत (पहिला डाव) : ९९.५ षटकांत सर्वबाद ३०६ धावा. (करुण नायर ९४, जयदेव उनाडकट ४८, जयंत यादव ४६, शेल्डॉन जॅक्सन ३७; अभिषेक नायर ३/३५, जय बिस्ता २/५२, इक्बाल अब्दुल्ला २/६२)
मुंबई (दुसरा डाव) : ०.४ षटकांत १ बाद २ धावा (अखिल हेरवाडकर १, जय बिस्ता खेळत आहे १; जयंत यादव १/२)

Web Title: The mighty Mumbai on the winning track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.