मिनी आयपीएलची योजना सध्या गुंडाळली- बीसीसीआय
By admin | Published: September 1, 2016 08:07 PM2016-09-01T20:07:13+5:302016-09-01T20:07:13+5:30
अमेरिकेत मिनी आयपीएल करण्याची योजना सध्यातरी गुंडाळण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिली.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - अमेरिकेत मिनी आयपीएल करण्याची योजना सध्यातरी गुंडाळण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी दिली. अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय करण्यासाठी मागच्या आठवड्यात भारत-विंडीज
यांच्यात दोन टी-२० सामने आयोजित करण्यात आले. याशिवाय तेथे मिनी आयपीएल करण्याची योजना होती. पण बोर्डाने ही योजना सध्या थंडबस्त्यात ठेवली आहे.
ही योजना सध्या का यशस्वी होऊ शकणार नाही, हे सांगताना ठाकूर म्हणाले, मिनी आयपीएल करण्यात सर्वांत मोठा अडसर वेळेचा आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील भौगोलिक अंतरही लांब आहे. भारतात आयपीएल सामना सायंकाळी
७ ते रात्री ११ या वेळेत आटोपण्यात येतो. त्यामुळे अमेरिकेत भारताच्या दृष्टीने सोयीचे होईल, अशा जागी सामने करावे लागतील. भारतात या सामन्यांचे प्रक्षेपण रात्री होणे फारच गरजेचे आहे.
भारतीय खेळाडू देशाबाहेर जरी खेळणार असतील तरी भारतीय प्रेक्षक बीसीसीआयसाठी मोलाचे आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांची नाराजी ओढवून घेऊ शकत नाही. मिनी आयपीएल करण्याआधी भारताच्या दृष्टीने सोयीचे ठरेल अशा अमेरिकेतील कुठल्या भागात सामन्यांचे आयोजन होऊ शकते याची चाचपणी करावी लागेल. बीसीसीआयची आयपीएल भारताबाहेर करण्याची सध्यातरी कुठलीही योजना नाही. आम्ही देशाबाहेर आयपीएल आयोजित करण्याचा विचार करू शकत नाही. पण यासाठी अनेक पर्याय असून त्यावर काही महिन्यात विचार केला जाऊ शकतो, असे ठाकूर यांचे मत आहे.
बीसीसीआयने आधी जून महिन्यात विदेशात मिनी आयपीएल आयोजित करण्याची योजना आखली होती. त्यानंतर ठाकूर यांनी देखील बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन सप्टेंबरमध्ये करू शकेल, असे सांगितले होते. पण आज त्यांनी असा कुठलाही
विचार सध्यातरी डोक्यात नसल्याचे सांगून काही काळासाठी मिनी आयपीएलची चर्चा बंद केली आहे.(वृत्तसंस्था)