सप्टेंबरमध्ये मिनी आयपीएल
By admin | Published: June 25, 2016 02:51 AM2016-06-25T02:51:44+5:302016-06-25T02:51:44+5:30
बीसीसीआयने सप्टेंबर महिन्यात भारताबाहेर नव्या टी-२० स्पर्धेच्या आयोजनाची तयारी केली असून, या स्पर्धेला ‘मिनी आयपीएल’ म्हणून सादर करण्यात येईल
धरमशाला : बीसीसीआयने सप्टेंबर महिन्यात भारताबाहेर नव्या टी-२० स्पर्धेच्या आयोजनाची तयारी केली असून, या स्पर्धेला ‘मिनी आयपीएल’ म्हणून सादर करण्यात येईल.
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बोर्डाच्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, ‘सप्टेंबर महिन्यात बीसीसीआय विदेशात मिनी आयपीएल किंवा आयपीएलचे आयोजन करण्यास इच्छुक आहे. त्यात सर्व आठ संघ सहभागी होतील.’
स्पर्धेचे स्वरूप छोटे राहणार असून त्यात ‘होम’ व ‘अवे’ या आधारावर सामने होणार नाहीत. सामन्यांची संख्या कमी राहील. स्पर्धेचा कालावधी दोन आठवड्यांचा राहील.’
ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर काही मिनिटांनी बीसीसीआयतर्फे प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकामध्ये बीसीसीआयतर्फे सप्टेंबर महिन्यात विदेशात मिनी आयपीएलचे आयोजन करण्याच्या पर्यायावर काम सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विदेशात आयपीएलचे आयोजन नवी बाब नाही. २००९ मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांच्या नियुक्तीला बैठकीमध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली. बैठकीमध्ये झालेल्या अन्य महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत एक क्रिकेटपटू केवळ एकदा भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल आणि अंडर-१९ मध्ये स्थान मिळवणारा क्रिकेटपटू या गटात केवळ दोन सत्र खेळण्यास पात्र राहील. अन्य निर्णयांमध्ये कसोटी क्रिकेटचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बीसीसीआयचे वेगेळ मार्केटिंग बजेट राहील.
भारताच्या मायदेशातील १३ कसोटी सामन्यांच्या व्यस्त सत्रासाठी सज्ज होताना बीसीसीआयने स्पष्ट केले की, ‘बीसीसीआय आणि सलग्न राज्य संघटना एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय सामन्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मार्केटिंग करतील.’
कार्य समितीने रणजी सामने तटस्थ स्थळावर आयोजित करण्याच्या तांत्रिक समितीच्या शिफारसीला मंजुरी दिली. स्थानिक क्रिकेटमध्ये मोठा बदल करताना सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या स्थानी एका नव्या टी-२० लीगच्या आयोजनाची घोषणा करण्यात आली. (वृत्तसंस्था)
गेल्या वर्षी चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर बीसीसीआयकडून अशा प्रकारच्या स्पर्धेच्या आयोजनाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. आयपीएलच्या या छोट्या स्वरूपाच्या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अद्याप पूर्ण कार्यक्रम तयार झालेला नाही; पण स्पर्धेचे संभाव्य स्थळ अमेरिका किंवा यूएई राहण्याची शक्यता आहे. यूएईने यापूर्वी २०१४ मध्ये आयपीएलच्या एका टप्प्यातील लढतींचे यमजानपद भूषविलेले आहे.
आयपीएलची पूर्ण स्पर्धा जवळजवळ दोन महिने चालते. यावेळी नवव्या पर्वाचे आयोजन ९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत करण्यात आले होते.बीसीसीआयतर्फे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकानुसार सर्वप्रथम राज्याचे संघ आपल्या संबंधित विभागाच्या विभागीय लीगमध्ये सहभागी होतील. त्यानंतर सर्व पाच विभाग आंतर विभागीय लीग स्पर्धेसाठी आपल्या विभागाचा संघ निवडतील. बीसीसीआयतर्फे सर्वोत्तम वेबसाईट, सर्वोत्तम फेसबुक पेज, सर्वोत्तम टिष्ट्वटर हँडल, सर्वोत्तम इंस्टाग्राम, सर्वोत्तम मीडिया सुविधा आणि सर्वोत्तम मीडिया संचालन यासाठी राज्य संघटनांना वार्षिक पुरस्कार देण्यात येईल.