मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 04:32 AM2019-12-21T04:32:33+5:302019-12-21T04:32:39+5:30
कतार आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन; ४९ किलो गटात राखला दबदबा
दोहा : भारतीय स्टार आणि माजी विश्वविजेती भारोत्तोलनपटू मीराबाई साईखोम चानू हिने शुक्रवारी सहाव्या कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत ४९ किलो गटात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या पदकांचे खाते उघडले. चानूने आॅलिम्पिक पात्रता स्पधोत १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले. टोकियो आॅलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्यावेळी मीराबाईला या जेतेपदाचा लाभ होणार आहे. त्याचवेळी, जेरेमी लालरिनुंगाने पुरुष गटात रौप्य पदकावर नाव कोरले.
टोकियो आॅलिम्पिकमध्ये पात्रता गाठण्यासाठी एका भारोत्तोलनपटूला नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२० या कालवधीत प्रत्येक सहा महिन्यात किमान एक व एकूण सहा स्पर्धा खेळणे अनिवार्य असते. याशिवाय प्रत्येक खेळाडूला किमान एक सुवर्ण जिंकावेच लागते. मीराबाईची सर्वोत्कृष्ट कामगिरी २०१ किलो वजन उचलण्याची आहे.
चानूने स्रॅच तसेच क्लीन अॅण्ड जर्कमध्ये केवळ एक लिफ्ट केली. तिने स्रॅचमध्ये ८३ तसेच क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १११ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. दुखापतग्रस्त झाल्यामुळे मीराबाई २०१८ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तसेच त्यानंतरच्या आशियाई स्पर्धेत खेळू शकली नाही.
त्याचवेळी, पुरुषांमध्ये ६७ किलो वजनी गटात जेरेमीने शानदार कामगिरी करताना ३०६ किलो वजन उचलून रौप्य जिंकले. त्याने स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १६६ किलो वजनाचा भार उचलला. (वृत्तसंस्था)