मिर्झा - हिंगीस उपांत्य फेरीत
By admin | Published: August 23, 2015 02:10 AM2015-08-23T02:10:50+5:302015-08-23T02:10:50+5:30
अग्रमानांकित सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस या अनुभवी जोडीने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठली.
सिनसिनाटी : अग्रमानांकित सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस या अनुभवी जोडीने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी पुरुषांच्या दुहेरीमध्ये लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
एकतर्फी झालेल्या सामन्यात वर्चस्व राखलेल्या सानिया - हिंगीस जोडीने अमेरिकेच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळवलेल्या क्रिस्टिना मशाले - कोको वांडेवेगे या जोडीचा ६-४, ६-१ असा धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये काहीसा प्रतिकार केलेल्या क्रिस्टिना - कोको जोडीचा दुसऱ्या सेटमध्ये मिर्झा - हिंगीस यांच्या आक्रमकतेपुढे
निभाव लागला नाही. उपांत्य सामन्यात या अव्वल जोडीचा सामना द्वितीय मानांकित हाओ चिंग चान - युंग जान चान या तैपेईच्या जोडीविरुद्ध होईल.
त्याचवेळी पुरुष दुहेरी गटात भारताच्या पेस व बोपण्णा यांना आपापल्या जोडीदारांसह उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. इवान डोडिज - मार्सेलो मेलो या द्वितीय मानांकित जोडीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत झुंजार खेळ करताना रोहन बोपण्णा - फ्लोरिन मर्जिया या पाचव्या मानांकित जोडीचा ६-१, १-६, १४-१२ असा पाडाव केला, तर यानंतरच्या अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात पेस - स्टानिलास वावरिंका या अनुभवी जोडीला फेलिसियानो लोपेझ - मॅक्स मिर्नयी यांना ३-६, ६-२, १४-१२ असे नमविले.(वृत्तसंस्था)