मिसबाहचे शतक, पाक ६ बाद २८२
By Admin | Published: July 15, 2016 02:19 AM2016-07-15T02:19:05+5:302016-07-15T02:19:05+5:30
इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस व्होक्सच्या (४-४५) अचूक माऱ्यानंतरही गुरुवारपासून लॉर्डस् येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हकने
लंडन : इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस व्होक्सच्या (४-४५) अचूक माऱ्यानंतरही गुरुवारपासून लॉर्डस् येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हकने (नाबाद ११०) शतकी खेळी करीत संघाचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी पाकिस्तानने ६ बाद २८२ धावांची मजल मारली होती. पाकच्या डावात असद शफिकचे (७३) योगदानही उल्लेखनीय ठरले.
वोक्सने ४ गडी बाद केले तर बॉल व ब्रॉड यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दिवसअखेर शतकवीर मिसबाह ११० धावांवर नाबाद होता. त्याआधी वोक्सने दोन्ही सलामीवीर शान मसूद (७) आणि मोहम्मद हफीज (४0) यांना तंबूत धाडले. अझहर अली (७) व युनिस खान (३३) यांना मोठी खेळी करता आली नाही.
इंग्लंडला पहिला बळी मिळविण्यासाठी १३ व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. वोक्सने त्याच्या सातव्याच चेंडूंवर संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याचा उसळता चेंडू डावखुरा फलंदाज मसूदच्या बॅटीला चाटून यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टॉ याच्या ग्लोव्हजमध्ये विसावला.
हफीज आणि मसूद यांनी सलामीसाठी ३८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर वोक्सने हफीजलादेखील यष्टिपाठीमागे झेलबाद केले.
हफीजने त्याच्या खेळीत आठ चौकार मारले. त्याआधी पाकिस्तानने वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याला अंतिम अकरा जणांत स्थान दिले. आमीर लॉर्डस् येथेच २0१0 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर पाच वर्षांची बंदी लादण्यात आली होती.(वृत्तसंस्था)