मिसबाहने केली रिचर्डस्ची बरोबरी

By Admin | Published: November 3, 2014 02:30 AM2014-11-03T02:30:40+5:302014-11-03T02:30:40+5:30

संथ खेळणा-या मिसबाहवर ‘टुकटुक’ फलंदाजी करणारा फलंदाज अशी टीका होते. पण आज त्याने नैसर्गिक शैलीला मुरड घालत फलंदाजी केली.

Missbahane Kelly Richards Equals | मिसबाहने केली रिचर्डस्ची बरोबरी

मिसबाहने केली रिचर्डस्ची बरोबरी

googlenewsNext

अबुधाबी : संथ फलंदाजीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेला पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हकने आज आॅस्ट्रेलियाविरुद्ध केवळ ५६ चेंडूंमध्ये शतक झळकावीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान शतक ठोकणाऱ्या विव्ह रिचर्डस्च्या विक्रमाची बरोबरी केली.
संथ खेळणा-या मिसबाहवर ‘टुकटुक’ फलंदाजी करणारा फलंदाज अशी टीका होते. पण आज त्याने नैसर्गिक शैलीला मुरड घालत फलंदाजी केली. त्याने केवळ ५७ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १०१ धावा फटकाविल्या. त्यात ११ चौकार व ५ षट्कारांचा समावेश आहे. या खेळीत त्याने ५६ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.
विंडीजचा आक्रमक फलंदाज रिचर्डस्ने इंग्लंडविरुद्ध १९८६मध्ये सेंट जोन्स मैदानावर केवळ ५६ चेंडूंमध्ये शतक झळकाविले होते. गेल्या २८ वर्षांत हा विक्रम अबाधित होता. पण आता हा विक्रम रिचर्डस् व मिसबाह यांच्या नावावर संयुक्तपणे नोंदविला गेला आहे.
मिसबाहने पाकिस्तानतर्फे सर्वांत वेगवान शतक झळकाविण्याचा माजीद खानचा ३८ वर्षे जुना विक्रम मोडला. माजीदने नोव्हेंबर १९७६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कराचीमध्ये ७४ चेंडूंमध्ये शतक झळकाविले होते.
त्याआधी मिसबाहने केवळ २१ चेंडूंमध्ये ५० धावा फटकावीत सर्वांत वेगवान अर्धशतक झळकाविण्याचा विक्रम नोंदविला. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसच्या नावावर होता. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध २००५ मध्ये न्यूझीलँडस्मध्ये केवळ २४ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकाविले होते.
वेळेचा विचार करता सर्वांत वेगवान शतक व अर्धशतकाचा विक्रम मिसबाहच्या नावावर नोंदला गेला आहे. त्याने केवळ २३ मिनिटांमध्ये अर्धशतक पूर्ण केले, तर ५१ मिनिटांमध्ये शतकाला गवसणी घातली. यापूर्वी आॅस्ट्रेलियाच्या जॅक ग्रेगरीने १९२१ मध्ये दिक्षण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये ७० मिनिटांमध्ये शतक ठोकले होते.
मिसबाहने आॅस्ट्रेलियाविरुद्ध या लढतीत दुसरे शतक झळकाविले. आॅस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटीत दोन शतक ठोकणारा तो पहिला कर्णधार ठरला. पाकतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतक झळकाविणारा तो दुसरा कर्णधार ठरला. (वृत्तसंस्था)


 

 

Web Title: Missbahane Kelly Richards Equals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.