१९ महिन्यांच्या मुलीची आठवण येते, पण ऑलिम्पिक...; तिरंदाज दीपिका कुमारीने केला त्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 08:46 AM2024-07-21T08:46:58+5:302024-07-21T08:47:23+5:30
दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे; पण आजही तिला या स्पर्धेत आपल्या पहिल्या पदकाची प्रतीक्षा आहे.
पॅरिस : पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये आव्हान देण्यासाठी सज्ज असलेली भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीला आपल्या १९ महिन्यांच्या मुलीची उणीव जाणवणार आहे; पण जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदकाचे स्वप्न साकारण्यासमोर हा त्याग तिला खूपच छोटा वाटतो.
दीपिका चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहे; पण आजही तिला या स्पर्धेत आपल्या पहिल्या पदकाची प्रतीक्षा आहे. दीपिका मुलीपासून दूर राहावे लागणार असल्यामुळे निराश आहे; पण ऑलिम्पिक पदकासमोर तिची याबाबत कोणतीही तक्रार नाही. दीपिकाने मुलाखतीत सांगितले की, आपल्या मुलीपासून वेगळे होण्याचे दुःख शब्दांत मांडणे कठीण आहे; पण हीच बाब तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एवढी वर्षे घालवली त्याबाबतही आहे.
दीपिका ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सुमारे दोन महिने मुलीपासून दूर राहिली. पॅरिसला रवाना होण्यापूर्वी पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये दीपिका काही काळ पती तिरंदाज अतनू दास आणि मुलीसोबत राहिली. दीपिका म्हणाली की, मला तिची उणीव खूप जाणवेल, पण अशा वेळी काही करता येत नाही. मुलगी कोणासोबतही खूप लवकर मिसळते. ती अतनू आणि माझ्या सासरच्या मंडळींमध्ये चांगल्याप्रकारे मिसळली आहे.
दीपिकासाठी डिसेंबर २०२२ मध्ये आई झाल्यानंतर खेळात पुनरागमन करणे खूप कठीण होते. तिचे स्नायू आखडले आणि तिला १९ किलोंचे धनुष्य उचलणे अशक्य झाले होते. अतनूने याबाबत सांगितले की, आम्ही अशाप्रकारे नियोजन केले की, आम्ही पॅरिसमध्ये स्पर्धा करू शकू, पण आई झाल्यानंतर सर्व काही तिच्यासाठी अगदी सुरुवातीपासून सुरू करण्यासारखे होते. बाण चालवणे किंवा धनुष्य उचलणे ही दूरचीच बाब होती. ती दैनंदिन कामे करण्यासही सक्षम नव्हती. तिने हळूहळू धावणे सुरू केले आणि त्यानंतर जिममध्ये भरपूर मेहनत घेतली. आपले करिअर संपले असेही दीपिकाला वाटू लागले होते. अतनू म्हणाला की, दीपिका त्यावेळी मला सांगत होती की, करिअर संपले असे वाटत आहे. मी आता यापुढे तिरंदाजी करू शकणार नाही.
दीपिकासाठी पॅरिस 'लकी'
दीपिकाने शांघाय विश्वचषकात रौप्यपदक जिंकण्याबरोबरच तीन महिने चाललेल्या निवड चाचणीत शानदार कामगिरी केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या दीपिकाने पॅरिसमध्ये अनेकदा संस्मरणीय कामगिरी केली आहे. २०२१ विश्वचषकात वैयक्तिक, सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकांची तिने हॅट्ट्रिक केली आहे. गतवर्षी पॅरिसमध्ये विश्वचषकात तिने रौप्यपदक जिंकले आहे, त्यामुळे यंदा तिला पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पदकाची आशा आहे.
ऑलिम्पिकच्या चर्चेमुळे दबाव
दीपिका म्हणाली की, ऑलिम्पिक जवळ आल्यानंतर देशात केवळ ऑलिम्पिकवर चर्चा सुरू होते. ही स्पर्धा जवळ आली की, प्रत्येकजण तिरंदाजीकडे पाहतो; त्यामुळे आमच्यावर अनावश्यक दबाव येतो. कोणत्याही अन्य स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धेकडे पाहणे गरजेचे आहे.