‘मिशन ११ मिलियन’ मोहीम उपयुक्त : प्रफुल्ल पटेल
By admin | Published: January 21, 2017 05:03 AM2017-01-21T05:03:05+5:302017-01-21T05:03:05+5:30
‘मिशन ११ मिलियन’ ही मोहीम भारतीय फुटबॉलला विश्व पातळीवर नवी ओळख निर्माण करुन देण्यात महत्त्वाची ठरेल
नागपूर : भारताच्या यजमानपदाखाली यंदा आयोजित वर्ल्डकप अंडर-१७ फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेली ‘मिशन ११ मिलियन’ ही मोहीम भारतीय फुटबॉलला विश्व पातळीवर नवी ओळख निर्माण करुन देण्यात महत्त्वाची ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’सोबत विशेष संवाद साधताना पटेल म्हणाले, ‘देशात फुटबॉलच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत आहे, यात शंका नाही. खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेला संघाच्या कामगिरीमध्ये उल्लेखनीय सुधारणा होण्याची जोड मिळावी, असे आम्हाला वाटते. किंबहुना ते बघण्यास आम्ही उत्सुक आहोत. ‘फीफा अंडर-१७ वर्ल्ड कप-२०१७’ याचे आयोजन म्हणजे या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘मिशन ११ मिलियन’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.’ पटेल यांची अलीकडे फिफाच्या सर्वांत महत्त्वाच्या वित्त समितीमध्ये निवड झाली आहे.
या व्यतिरिक्त त्यांची आशियाई फुटबॉल परिषदेचे (एएफसी) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची धुरा सांभाळत असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची फिफाचे अध्यक्ष जिएनी इन्फॅन्टिनो यांनी प्रशंसा केलेली आहे. भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष ‘मिशन ११ मिलियन’ मोहिमेला देशाच्या फुटबॉलच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानतात. त्यांचे मते ‘भारतात फुटबॉलबाबत विशेष आवड आहे. त्यामुळे अनेक नवे प्रतिभावान खेळाडू समोर येत आहेत, पण आपल्यापुढे महत्त्वाची अडचण म्हणजे, या गुणवान खेळाडूंना दर्जेदार सुविधा प्रदान करण्याची आहे. आर्थिक अडचणीमुळे खेळाडूंना पायभूत सुविधा प्रदान करण्यास अडचण भासत आहे. त्यामुळे शालेय पातळीवर ‘मिशन ११ मिलियन’ ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रासरुट पातळीवर फुटबॉलसाठी नवी प्रतिभा शोधण्यास मदत मिळेल.’ या योजनेला केंद्र सरकारचे समर्थन मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. प्रफुल्ल पटेल म्हणाले,‘सर्वांत आनंदाची बाब म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेमध्ये स्वारस्य दाखविले आहे. आपला खास कार्यक्रम ‘मन की बात’ यामध्ये पंतप्रधानांनी याचा उल्लेख केला आहे. एकूण विचार करता २०१७ हे वर्ष भारतीय फुटबॉलसाठी संस्मरणीय ठरेल.’
>काय आहे ‘मिशन ११ मिलियन’
भारतीय फुटबॉल महासंघाच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात सप्टेंबर २०१६ मध्ये गोवा येथे झालेली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या ३० शहरातील १२ हजार शाळांच्या ११ कोटी १० लाख (१० ते १८ वयोगटातील) विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील क्रीडा मंत्रालयांनाही जोडण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी ही योजना आणखी चांगल्या पद्धतीने राबविण्यास मदत मिळेल. या कार्यक्रमाच्या अखेर प्रत्येक शाळेतील २५ प्रतिभावान विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून त्यांना समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी प्रदान करण्यात येणार आहे.
>पंतप्रधान मोदी यांनी टिष्ट्वटरवर केले आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वट करीत देशातील युवकांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘मिशन ११ मिलियन मोहीम फुटबॉलसोबत जुळण्याचे राष्ट्रव्यापी आंदोलन आहे. त्यात काश्मीरपासून कन्याकुमारी आणि कच्छपासून अरुणाचल प्रदेशचे विद्यार्थी या खेळाचा आनंद घेतील.’ पंतप्रधानांनी पालक व शिक्षकांना या खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.