मिशन फायनल
By admin | Published: January 3, 2016 01:37 AM2016-01-03T01:37:34+5:302016-01-03T01:37:34+5:30
सहा वेळचा चॅम्पियन भारतीय संघ रविवारी दक्षिण आशियाई फुटबॉल संघटना (सॅफ) फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी बलाढ्य अफगाणिस्तानशी भिडण्यास सज्ज झाला आहे.
तिरुवनंतपुरम् : सहा वेळचा चॅम्पियन भारतीय संघ रविवारी दक्षिण आशियाई फुटबॉल संघटना (सॅफ) फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी बलाढ्य अफगाणिस्तानशी भिडण्यास सज्ज झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून वरचढ ठरत असलेल्या अफगाणिस्तानला टक्कर देण्यासाठी युवा खेळाडूंनी भरलेली भारतीय
चमू आपल्या सर्वोत्तम खेळीचा
प्रयत्न करील.
अफगाणिस्तानने आपल्या खेळात कमालीची सुधारणा करताना सॅफ स्पर्धेत दबदबा राखणाऱ्या भारतासमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. तरी स्टीफन कॉन्स्टेन्टाइन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत असलेल्या भारताच्या यंग ब्रिगेडने अफगाण संघाला धक्का देण्याचा निर्धार केला आहे. भारताने २०११ साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना अफगाणिस्तानला ४-० असे लोळवले होते. या वेळी स्टार फुटबॉलर सुनील छेत्रीने शानदार हॅट्ट्रिक करताना निर्णायक कामगिरी केली होती. दोन वर्षांनी अफगाणिस्तानने याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला २-० असे नमवून हिशोब चुकता केला होता. आता भारताला याच पराभवाचा वचपा काढण्याची संधी मिळाली आहे.
गतस्पर्धेच्या भारतीय संघातील छेत्री, जेजे लालपेखलुआ, अर्नब मंडल, सुब्रत पाल आणि रॉबिन सिंग हे पाच खेळाडू यंदाच्या स्पर्धेत खेळत आहेत. उर्वरित संपूर्ण भारतीय संघ हा नवखा आहे. विशेष म्हणजे हुकमी रॉबिन सिंग हा दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतरही भारताने चमकदार कामगिरी केली. कर्णधार छेत्रीच्या शानदार नेतृत्वाला अनुभवी खेळाडूंची योग्य साथ लाभत आहे. छेत्री आणि जेजे या अव्वल आक्रमकांना साथ देण्यासाठी होलिचरन नरजारी व मिझोरमचा १८वर्षीय युवा स्ट्रायकर लालियांजुआला छांगटे तयार असतील. त्याचवेळी कॉन्स्टेन्टाइन यांच्या कौतुकास पात्र ठरलेला रॉलिन बोर्गेससह मिडफील्डला यूजीनेसन लिंगदोह जबाबदारी पार पाडेल. तसेच बिकास जायरु याच्यावरही भारताची मदार असेल. (वृत्तसंस्था)