मिशेल स्टार्क मालिकेबाहेर
By admin | Published: March 11, 2017 04:11 AM2017-03-11T04:11:57+5:302017-03-11T04:11:57+5:30
आॅस्ट्रेलियाचा मुख्य वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क डाव्या पायाला झालेल्या ट्रेस फ्रॅक्चरमुळे भारत दौऱ्यातून बाहेर पडला आहे. सुरुवातीच्या दोन्ही कसोटीत फलंदाजी- गोलंदाजीत
रांची : आॅस्ट्रेलियाचा मुख्य वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क डाव्या पायाला झालेल्या ट्रेस फ्रॅक्चरमुळे भारत दौऱ्यातून बाहेर पडला आहे. सुरुवातीच्या दोन्ही कसोटीत फलंदाजी- गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणारा स्टार्क बाहेर पडताच पाहुण्यांना जबर धक्का बसला.
पुण्यातील पहिल्या कसोटीत फिरकीला उपयुक्त खेळपट्टीवर त्याने अर्धशतक झळकविल्यानंतर भारताचे पाच गडी बाद केले होते. बंगलोर येथे दुसऱ्या कसोटी दरम्यान डाव्या पायाला त्रास होऊ लागला. सामना संपल्यानंतर दुखणे बरे न झाल्याने त्याला मायदेशी परत पाठविण्यात येत असल्याची माहिती संघाचे फिजिओ डेव्हिड बीकले यांनी दिली.
बंगलोरयेथे शुक्रवारी सकाळी डाव्या पायाचे स्कॅन करण्यात आले. त्यातून स्ट्रेस फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. बीकले म्हणाले, ‘भारत दौऱ्यातील या पुढील सामन्यात स्टार्क खेळू शकणार नाही. तो उपचारासाठी आॅस्ट्रेलियाला परत जाईल.
अष्टपैलू मिशेल मार्श खांदेदुखीमुळे आधीच मायदेशी परतल्यानंतर दौऱ्यातून बाहेर होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्टार्कच्या नावाचा समावेश झाला. स्टार्कची जागा कोण घेणार, याची घोषणा अद्याप झालेली नाही. सध्या जॅक्सन बर्ड हा संघात राखीव वेगवान गोलंदाज आहे.
राष्ट्रीय निवड समिती स्टार्कची जागा घेणाऱ्या खेळाडूचे नाव जाहीर करेल, असे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने म्हटले आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळविल्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आली. तिसरा कसोटी सामना रांची येथे १६ मार्चपासून सुरू होईल. (वृत्तसंस्था)
अनुपस्थितीचा प्रभाव जाणवेल : क्लार्क
वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. आॅस्ट्रेलिया संघासाठी हा मोठा धक्का असून, स्टार्कच्या अनुपस्थितीचा मालिकेवर मोठा प्रभाव जाणवेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले.
‘स्टार्कच्या अनुपस्थितीचा आॅस्ट्रेलिया संघावर मोठा प्रभाव पडेल. मिशेल स्टार्क आॅस्ट्रेलिया संघाचा हुकमी एक्का आहे. त्याची नक्कीच उणीव भासेल. त्याच्या स्थानी कुणाची निवड करण्यात येईल, याची मला कल्पना नाही, पण आॅस्ट्रेलिया संघापुढील आव्हान मात्र आणखी खडतर झाले आहे.’
‘पुुणे कसोटीत आॅस्ट्रेलियाने विजय मिळवला होता आणि रांचीमध्येही हा संघ विजय मिळवू शकतो.’
क्लार्कने डीआरएसबाबत कुठलाही प्रश्न उपस्थित केला नाही, पण विराट कोहलीची आक्रमकता ही त्याची मजबूत बाजू असल्याचे क्लार्क म्हणाला. ‘विराटला आक्रमक खेळ करण्यास आवडते. त्याने त्याच पद्धतीने यश मिळवले आहे. भविष्यातही तो आक्रमकता कायम ठेवेल. ’’
‘दोन्ही संघांची स्पर्धा शानदार’
भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेबाबत बोलताना क्लार्क म्हणाला, ‘उभय संघांदरम्यान कसोटी क्रिकेट नेहमीच स्पर्धात्मक असते. मला हे आवडते. ही मालिका शानदार आहे. मालिका भारतात खेळली जात असेल किंवा आॅस्ट्रेलियात, पण स्पर्धात्मक क्रिकेट खेळले जाते. ही मालिकाही याला अपवाद नाही.’