मिताली राजने रचला इतिहास, सचिन-धोनीसह अनेक दिग्गजांना टाकलं मागे
By Admin | Published: July 12, 2017 07:49 PM2017-07-12T19:49:03+5:302017-07-12T19:49:03+5:30
भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने महिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12 - भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने महिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. यासह तिने अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. मितालीने केवळ महिला क्रिकेटर नाही तर अनेक दिग्गज पुरूष क्रिकेटपटूंनाही मागे टाकलं आहे.
इंग्लंडमध्ये सध्या महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. बुधवारी म्हणजे आज ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिताली ब्रिस्टलच्या मैदानावर उतरली त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्डपासून मिताली केवळ 41 धावा दूर होती. या सामन्यात 114 चेंडूंमध्ये 69 धावा फटकावून मिताली बाद झाली, पण त्याआधी तिने 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला. 183 एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने 191 सामन्यांमध्ये 5992 धावा बनवल्या होत्या.
सचिन, धोनी आणि पॉन्टिंगला टाकलं मागे -
दिग्गज पुरूष खेळाडूंचा विचार करता 6 हजार धावा पूर्ण करताना मितालीने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं. तिने 183 सामन्यांमध्ये केवळ 164 डावांमध्येच हा रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे क्रिकेटचा भगवान सचिन तेंडुलकरने 170 डावांमध्ये 6 हजार धावांचा आकडा ओलांडला होता. तर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने 166 डावांमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. याशिवाय भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा धडाकेबाज महेंद्रसिंग धोनीने 2011 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 6 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यासाठी तो 166 डाव खेळला.
या दिग्गज खेळाडूंशिवाय विस्फोटक खेळाडूंमध्ये गणना होत असलेल्या विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हर्शल गिब्स, ब्रॅंडन मॅक्यूलम, दिलशान ,अझरूद्दीनसह अॅलन बॉर्डरसारख्या खेळाडूंनाही मितालीने याबाबतीत मागे टाकलं आहे.