धावांच्या एव्हरेस्टवर मिताली ‘राज’!

By admin | Published: July 13, 2017 12:40 AM2017-07-13T00:40:34+5:302017-07-13T00:40:34+5:30

भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला

Mithali Raj on the highest run! | धावांच्या एव्हरेस्टवर मिताली ‘राज’!

धावांच्या एव्हरेस्टवर मिताली ‘राज’!

Next

ब्रिस्टल : भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला. एवढेच नव्हे, तर ६००० धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू बनली. आयसीसी महिला विश्वचषकात आॅस्ट्रेलियाविरुद्ध साखळी फेरीतील सामन्यात ३४ धावा करताच मिताली राज हिने धावांचा ‘एव्हरेस्ट’ सर केला.
६ हजार धावा पूर्ण करण्यासाठी तिला ४१ धावांची आवश्यकता होती. लेग स्पिनर क्रिस्टीन बिम्सच्या चेंडूवर षटकार ठोकत तिने विश्वविक्रमही नोंदवला. तिने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लाेट एडवर्ड्सचा विक्रम मोडला. एडवर्ड्सने १९१ सामन्यांत ५९९२ धावा केल्या होत्या. जून १९९९ मध्ये पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय कर्णधार मिताली राजचा १८३ वा एकदिवसीय सामना होता. याशिवाय तिने १० कसोटीत ६६३ आणि ६३ टी-२० सामन्यांत १७०८ धावा केल्या आहेत. तिच्या नावावर पाच एकदिवसीय शतके आणि ४९ अर्धशतकांची नोंद आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला ‘टॉप’वर
मिताली राजने धावांचा एव्हरेस्ट पार केला, तर गोलंदाजी क्षेत्रात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे. झुलन गोस्वामीच्या नावावर १८९ बळी आहे. तिने नुकताच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आॅस्ट्रेलियाच्या कॅथरीन फिट्सपॅट्रिक हिचा १८० बळींचा विक्रम मोडला. योगायोग म्हणजे, पुरुष क्रिकेटमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्यामुळे क्रिकेटवरील भारतीय वर्चस्व स्पष्ट होते. ९ अर्धशतके एकाच वर्षात. गेल्या वर्षी इलीज पेरी हिने ९ अर्धशतके ठोकली होती. मितालीने या वर्षी १२ डावांत ७७.६२ च्या सरासरीने ६२१ धावा केल्या. ५ नाबाद शतकांचा समावेश. दहापैकी ९ सर्वाेच्च खेळींत तिने नाबाद खेळी केली.
११४ धावांची पदार्पणात खेळी. आयर्लंडविरुद्ध १९९९ मध्ये ही कामगिरी. महिला क्रिकेटमध्ये पाच फलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. पदार्पणात मितालीची तिसऱ्या क्रमांकाची सर्वाेच्च खेळी होती.
१६ वर्षे २०५ दिवस एवढे वय असताना मितालीने महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले. ती सर्वांत तरुण फलंदाजी ठरली.
१७ वर्षांखालील कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
>भारतीय क्रिकेटसाठी मोठा क्षण आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत जास्त धावा केल्या. अभिनंदन..
- विराट कोहली
सर्वोत्तम बातमी, मिताली राज ही सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू बनली. अभिनंदन
- अनिल कुंबळे
मिताली राज ही सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू, सर्वोत्तम यश.
- अजिंक्य रहाणे
सर्वोत्तम यश, मिताली राज ही ६ हजार धावा करणारी पहिली महिला खेळाडू बनली; तसेच सर्वांत जास्त धावा करणारी खेळाडू बनली, दोन्ही विक्रम तिच्याच नावे.
- लिसा स्थळेकर
मिताली राज हिच्या खेळात होत असलेली प्रगती तिच्या वयाच्या दहाव्या वर्षांपासून पाहत आहे. तिने आता सहा हजार धावा केल्या, अभिनंदन मिताली राज
- व्ही.व्ही.एस. लक्ष्मण
अभिनंदन मिताली राज, महिला क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त धावा करण्याचा मान तू पटकावला. हे मोठे यश आहे. आजची खेळी सर्वोत्तम होती.
- सचिन तेंडुलकर
अभिनंदन मिताली राज, उल्लेखनीय पराक्रम, महिलाशक्ती.
- हरभजन सिंह

अभिनंदन मिताली राज, आम्हाला तुझा अभिमान आहे.
-शिखर धवन
अभिनंदन भारतीय रनमशिन, महिला क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त
धावा, टू चॅम्पियन. - गौतम गंभीर

Web Title: Mithali Raj on the highest run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.